सावानाचा २७ पासून शब्द जागर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:13 AM2021-05-24T04:13:17+5:302021-05-24T04:13:17+5:30
नाशिक : सार्वजनिक वाचनालय म्हणजे वाचन संस्कृती वाढविण्याबरोबरच दर्जेदार बौद्धिक खाद्य पुरवणारी संस्था आहे. त्यामुळेच या संस्थेने कोरोना ...
नाशिक : सार्वजनिक वाचनालय म्हणजे वाचन संस्कृती वाढविण्याबरोबरच दर्जेदार बौद्धिक खाद्य पुरवणारी संस्था आहे. त्यामुळेच या संस्थेने कोरोना काळात श्रोत्यांची वैचारिक भूक भागवण्यासाठी २७ मेपासून सहा दिवसांच्या शब्द जागरचे आयोजन केले आहे.
या व्याख्यानांचा लाभ श्रोत्यांना आपापल्या घरीच दररोज सायंकाळी ६ वाजता ऑनलाईन घेता येणार आहे. त्यात २७ मे या दिवशी सावरकर विचारांना संपूर्ण आयुष्य अर्पण केलेले अभिनेते शरद पोंक्षे यांचे सावरकर विचार दर्शन या विषयावरील व्याख्यान रंगणार आहे. तर २८ मे या दिवशी सावरकर अभ्यासक आणि खगोलतज्ज्ञ गिरीश पिंपळे यांचे शतपैलू सावरकर या विषयावर व्याख्यान रंगणार आहे. २९ मे या दिवशी ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ हे अशोक देवदत्त उर्फ आप्पा टिळक- एक वेगळे व्यक्तिमत्व या विषयावरील व्याख्यानात रंग भरणार आहेत. तर ३० मे या दिवशी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर धनंजय केळकर हे कोरोनाच्या चक्रव्यूहाचा भेद या विषयावर त्यांचे विचार मांडणार आहेत. ३१ मे या दिवशी ज्येष्ठ लेखक, अभिनेते दीपक करंजीकर यांचे आपत्तीतील ऊर्जा या विषयावर व्याख्यान होणार आहे. तर १ जून या दिवशी समीक्षक, साहित्यिक एकनाथ पगार हे लक्ष्मीबाई टिळक स्मृतिचित्रे या विषयावर व्याख्यान देणार आहेत.