बचतगटांची रेशन दुकाने आचारसंहितेच्या कचाट्यात
By admin | Published: October 29, 2016 01:11 AM2016-10-29T01:11:59+5:302016-10-29T01:12:33+5:30
बचतगटांची रेशन दुकाने आचारसंहितेच्या कचाट्यात
नाशिक : नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने जिल्ह्यातील २४५ रेशन दुकानांचे परवाने बचतगटांना देण्याच्या कार्यवाहीला ब्रेक बसला असून, साधारणत: जानेवारीच्या अखेरीस प्रत्यक्षात दुकाने सुरू करण्याचा पुरवठा खात्याच्या प्रयत्न असला तरी, त्यावेळीही जिल्ह्णात जिल्हा परिषद निवडणुकीची धामधूम सुरू राहणार असल्याने मार्चनंतरच्या मुहूर्तावरच दुकाने उघडण्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत वेळोवेळी पुरवठा खात्याच्या वतीने करण्यात आलेल्या रेशन दुकान तपासणी मोहिमेत दोषी आढळून आलेल्या दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले, तर काही दुकानदार धान्याचा काळाबजार करताना सापडल्यामुळे अशांचेही दुकाने बंद करण्याची कार्यवाही करण्यात आली
आहे. अशा दोषी २४५ दुकानांचे पुनरुज्जीवन करताना त्यात महिलांच्या बचत गटांना प्राधान्य देण्याच्या शासनाच्या धोरणानुसार जिल्हा पुरवठा कार्यालयाने १४ आॅक्टोबर रोजी जाहीरनामे प्रसिद्ध केले. दरम्यान, दोनच दिवसांत राज्यात नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीची आचारसंहिता जारी करण्यात आली. तहसीलदार व प्रांत अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या बचत गटांच्या प्रस्तावांची छाननी करून ते २३ नोव्हेंबरपर्यंत पुरवठा कार्यालयात सादर करून २३ डिसेंबर रोजी जिल्हा पुरवठा कार्यालय त्यावर अंतिम निर्णय घेणार होते. जानेवारीत ग्रामसभांची अनुमती मिळाल्यावर साधारणत: फेब्रुवारी महिन्यात परवाने अदा करून प्रत्यक्ष दुकाने सुरू करण्यात येणार होती. तथापि, सध्या नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने जाहीरनामे प्रसिद्ध करूनही प्रत्यक्षातील अर्ज स्वीकारण्याची कार्यवाही स्थगित करण्यात आलेली आहे. तथापि, नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर लगेचच महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची तयारी सुरू होणार असून, डिसेंबरमध्ये आचारसंहिता लागू केली जाईल. त्यामुळे बचत गटांना रेशन दुकाने देण्यात पुन्हा अडचणी निर्माण होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी मार्चमध्ये संपुष्टात येणार असल्याने त्यानंतरच बचत गटांना परवाने देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
तालुकानिहाय रेशन दुकाने
नाशिक तालुका - १२, नाशिक शहर - ६, इगतपुरी - १०, त्र्यंबकेश्वर - १०, दिंडोरी - १८, पेठ - १७, निफाड - ३९, सिन्नर - १६, येवला - १०, नांदगाव - ११, चांदवड - १८, देवळा - ६, कळवण - १९, सुरगाणा - २४, मालेगाव तालुका - ९, मालेगाव शहर - १ व बागलाण - १९.