बदनामी करणाऱ्यांना सावरकर समजलेच नाहीत : सोमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 01:25 AM2020-01-13T01:25:36+5:302020-01-13T01:26:11+5:30
ब्रिटिशांना जेरीस आणण्यासाठी क्रांतिकारकांनी केलेल्या कृत्याची जबाबदारी मी घेत असून, माझ्यावर खटला भरा, असा विनंती अर्ज स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिश न्यायालयात केला होता. ज्यांना सावरकर समजलेच नाही ते सावरकरांची बदनामी करत असल्याचे मत सिनेकलावंत योगेश सोमण यांनी व्यक्त केले.
मनमाड : ब्रिटिशांना जेरीस आणण्यासाठी क्रांतिकारकांनी केलेल्या कृत्याची जबाबदारी मी घेत असून, माझ्यावर खटला भरा, असा विनंती अर्ज स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिश न्यायालयात केला होता. ज्यांना सावरकर समजलेच नाही ते सावरकरांची बदनामी करत असल्याचे मत सिनेकलावंत योगेश सोमण यांनी व्यक्त केले.
येथील सीतालक्ष्मी हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विवेकानंद व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर खलनायक की महानायक’ या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ. भारती पवार, माजी आमदार जगन्नाथ धात्रक, डॉ. पूनम राजपूत, प्रमोद बापट, बाबा रणजितसिंग, समितीचे अध्यक्ष अमोल तावडे, किशोर नावरकर आदी उपस्थित होते.
शिक्षेपासून पळ नाही
सावरकरांचा इतिहास उलगडून सांगताना सोमण म्हणाले की, बोटीवरून सावरकरांनी मारलेली उडी ही शिक्षेपासून पळून जाण्यासाठी केलेला प्रयत्न नव्हता तर फ्रान्सच्या भूमीमध्ये प्रवेश करून ब्रिटिश सरकारविरोधात त्यांना रान पेटवायचे होते. त्यांच्या जहाल कारवायांमुळे सावरकर हे ब्रिटिशांसाठी एक खलनायकच ठरले असल्याचे सोमण यांनी स्पष्ट केले.
वंदे मातरम्ने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. योगेश म्हस्के यांनी स्वागत केले. पाहुण्यांचा परिचय प्रसाद दिंडोरकर यांनी करून दिला. रमाकांत मंत्री यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख अतिथींनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन प्रमोद मुळे यांनी केले. आभार अमोल तावडे यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.