खळ्यास आग लागल्याने सव्वा लाखाचे नुकसान
By Admin | Published: February 2, 2016 11:32 PM2016-02-02T23:32:48+5:302016-02-02T23:33:45+5:30
आडवाडी : वीजवाहक तारांमुळे गवत पेटल्याचा संशय
ठाणगाव : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातल्या ठाणगावजवळील आडवाडी (वरची) येथे खळ्यास आग लागल्याने मळणीसाठी ठेवलेले वरई, भात, नागली, ज्वारी आदि पिकांसह जनावरांचा चारा जळून खाक झाला. मंगळवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान घडलेल्या या दुर्घटनेत शेतकऱ्याचे सुमारे सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. खळ्याजवळच असलेल्या वीजवाहक तारांमध्ये घर्षण होऊन आग लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
आडवाडी (वरची) येथील गट नंबर ४४५ मध्ये दत्तू किसन बिन्नर यांच्या मालकीचे खळे आहे. त्यात बिन्नर यांनी ५० क्विंटल भात, १२ क्विंटल वरई, २ क्विंटल नागली, ५ क्विंटल ज्वारी ही पिके मळणीसाठी ठेवली होती. जनावरांसाठी इगतपुरी तालुक्यातून विकत आणलेल्या वाळलेल्या गवताच्या तीन हजार पेंड्यांची वळई खळ्याजवळ रचलेली होती. मंगळवारी दुपारी गावाजवळील श्रीकृष्ण मंदिरात सुरेश बिन्नर, पाटीलबुवा बिन्नर, मदन बिन्नर, शिवाजी बिन्नर यांच्यासह ग्रामस्थ बसलेले होते. यावेळी त्यांना आगीचे प्रचंड लोट आणि धूर दिसू लागले. ग्रामस्थांनी घरांतील पाणी घेऊन आग विझवण्यासाठी खळ्याकडे धाव घेतली. तथापि, तोपर्यंत चाऱ्यासह पिकांनी चांगलाच पेट घेतला होता. आगीची माहिती सिन्नर नगरपालिकेच्या अग्निशमन दलास कळविण्यात आली. अडीच वाजेच्या सुमारास अग्निशमन बंबाची गाडी आल्यानंतर आग विझविण्यात यश आले. (वार्ताहर)