केरळ पूरग्रस्तांसाठी सव्वालाखाची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 11:05 PM2018-08-21T23:05:15+5:302018-08-22T00:24:39+5:30
सामाजिक बांधिलकी जोपासत, राष्टय संकटात मदत म्हणून व माणुसकीच्या नात्याने केरळ येथील पूरग्रस्तांना मालेगाव मर्चंट बँक व मामको जनकल्याण ट्रस्टच्या वतीने एक लाख २५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे.
मालेगाव : सामाजिक बांधिलकी जोपासत, राष्टय संकटात मदत म्हणून व माणुसकीच्या नात्याने केरळ येथील पूरग्रस्तांना मालेगाव मर्चंट बँक व मामको जनकल्याण ट्रस्टच्या वतीने एक लाख २५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला जाणार असल्याची माहिती मामकोचे चेअरमन नरेंद्र सोनवणे, ज्येष्ठ नेते राजेंद्र भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. केरळात झालेल्या अतिवृष्टीमुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुराच्या संकटामुळे सर्वसामान्य माणूस कोलमडून पडला आहे. देशभरातून खाद्यपदार्थ, वैद्यकीय सेवा व इतर सुविधा पुरविल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर मामको बँकेच्या संचालकांची तातडीची बैठक सोमवारी बोलविण्यात आली होती. या बैठकीत मामको बँकेतर्फे एक लाख तर मामको जनकल्याण ट्रस्टतर्फे २५ हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णय सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यापूर्वीदेखील बँकेने सामाजिक बांधिलकी जोपासत शेतकरी आत्महत्या, उत्तरखंड पूर, मालेगाव बॉम्बस्फोट आदी घटनांमध्ये आर्थिक मदत केली आहे. तसेच सामाजिक बांधिलकी जोपासत सप्तशृंगीगडावर जाणाऱ्या ६५ हजार भाविकांना मामको जनकल्याण ट्रस्टतर्फे वैद्यकीय सेवा पुरविण्यात आली. वैकुंठरथदेखील उपलब्ध असतो. बँक केवळ कर्जावरील व्याज व ठेवी गोळा न करता माणुसकीच्या नात्याने प्रत्येक संकटात मदत करीत असते. राष्टÑीय संकट निवारण्यासाठी बँक अग्रेसर आहे. जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्याकडे आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द केला आहे. सदरचा धनादेश केरळच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीत वर्ग करून पूरग्रस्तांना त्यातील निधीचे वाटप केले जाणार असल्याची माहिती चेअरमन सोनवणे, भोसले यांनी यावेळी दिली.
पत्रकार परिषदेला बँकेचे संस्थापक हरिलालशेठ अस्मर, व्हाइस चेअरमन मंगला भावसार, संचालक संजय दुसाने, सतीश कलंत्री, चंदू बच्छाव, विठ्ठल बागुल, मामको जनकल्याण ट्रस्टचे अध्यक्ष भिका कोतकर आदी यावेळी उपस्थित होते.