भावी पिढीला सावरकर समजावून देण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 11:06 PM2020-01-25T23:06:17+5:302020-01-26T00:12:33+5:30
मी विनायक दामोदर सावरकरांची कथा इथेच थांबवतो आहे. काळाच्या ओघात अनेकदा इतिहास बदलतात, पण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे कसे होते ते तुम्हीच ठरवा अन् तुमच्या भावी पिढीला सावरकर सांगा’ असे आवाहन व्यासपीठावरून करताच सभागृहात प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जयजयकार करत सभागृह दणाणून सोडले.
नाशिक : ‘मी विनायक दामोदर सावरकरांची कथा इथेच थांबवतो आहे. काळाच्या ओघात अनेकदा इतिहास बदलतात, पण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे कसे होते ते तुम्हीच ठरवा अन् तुमच्या भावी पिढीला सावरकर सांगा’ असे आवाहन व्यासपीठावरून करताच सभागृहात प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जयजयकार करत सभागृह दणाणून सोडले.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सखी मंडळाच्या वतीने कुर्तकोटी सभागृहात योगेश सोमण यांच्या ‘मी विनायक दामोदर सावरकर’ या एकपात्री प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या दीड तासांच्या कार्यक्रमास सोमन यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवनपट प्रेक्षकांसमोर उभा केला. सावरकर यांचे बालपण, त्यांचे शिक्षण, शिक्षण सुरू असतानाच स्वातंत्र लढ्यात त्यांनी घेतलेली उडी, विवाह, लंडन येथे स्थापन केलेली अभिनव भारत ही गुप्त क्रांतिकारी संघटना, पॅरीसमधील भेटी, तेथे केलेली शस्त्र खरेदी, पुढे त्यांच्यावर चाललेला खटला आणि झालेली काळ्या पाण्याची शिक्षा, अंदमानच्या जेलमध्ये करावी लागेली जीवघेणी कामं तेथील शिक्षा, जेलर डेव्हीड बॅरीशी वेळोवेळी झालेला संवाद आणि दहा वर्षांनंतर तेथून झालेली सुटका असे प्रसंग त्यांनी आपल्या खास शैलीत मांडले.
म्हणजे माफी मागणे नाही..
सावरकर यांचा माफीनामा हा वादाचा विषय आहे. त्यावर याच प्रयोगातून भाष्य करताना सोमण यांनी जेलमधून आपली सुटका करून घेणे हा प्रत्येक कैद्याचा हक्क आहे. त्यासाठी पिटीशन दाखल करणे म्हणजे माफी मागणे होत नाही. त्याचदृष्टीने १९२० साली जेल कमिशनसमोर साक्ष दिली. त्याचे पडसाद आजपर्यंत उमटत आहेत, असे स्पष्टीकरण दिले. सावरकर यांची कोठडी ज्या ठिकाणी होती, त्याठिकाणावरून कैद्यांना फाशी कशी दिली जाते, हे स्पष्टपणे दिसत होते. त्याकाळी जेलमध्ये पंधरा दिवसातून दोन ते तीन जणांना फाशी दिली जात असे, यादृष्यांमुळेही सावरकर आपल्या ध्येयापासून विचलित झाले नसल्याचेही ते म्हणाले.