सावरकरनगरला उडाला थरकाप...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 12:59 AM2019-01-26T00:59:50+5:302019-01-26T01:00:11+5:30
सावरकरनगरमध्ये शिरलेल्या बिबट्याने परिसरात अनेक ठिकाणी धुमाकूळ घातल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. ‘मारवा हाउस’ या बंगल्यात बिबट्या शिरल्यानंतर तेथील पार्किंगमध्ये वाहनासाठी बनविलेल्या सिमेंट-कॉँक्रिटच्या खोलीत बिबट्या शिरला. यावेळी वनकर्मचाऱ्यांनी त्या खोलीच्या द्वारावर जाळी सोडली.
नाशिक : सावरकरनगरमध्ये शिरलेल्या बिबट्याने परिसरात अनेक ठिकाणी धुमाकूळ घातल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. ‘मारवा हाउस’ या बंगल्यात बिबट्या शिरल्यानंतर तेथील पार्किंगमध्ये वाहनासाठी बनविलेल्या सिमेंट-कॉँक्रिटच्या खोलीत बिबट्या शिरला. यावेळी वनकर्मचाऱ्यांनी त्या खोलीच्या द्वारावर जाळी सोडली.
दरम्यान, खोलीच्या पत्र्यांवर दगड काही नागरिकांनी आजूबाजूच्या इमारतींवरुन फेकल्याने बिबट बिथरला आणि त्याने जाळीतून बाहेर झेप घेत पळ काढला. यावेळी बंगल्याच्या मुख्य द्वाराजवळ सहा फुटाच्या भिंतीवर उभे असलेले वृत्तवाहिनीचे छायाचित्रकार तबरेज शेख, कपिल भास्कर यांच्यावर चाल करत पंजाने दोघांना जखमी करुन बिबट्याने खाली पाडले. त्यानंतर बिबट्या पुन्हा वाहनाच्या खोलीत शिरला. यावेळी वनपरिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार यांनी बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शन सोडले. इंजेक्शन बिबट्याला लागल्यानंतर बिबट्या पुन्हा चवताळला अन बाहेर पळत असताना समोर वन कर्मचारी जाळी घेऊन उभे होते त्यात अडकला. यावेळी नीलेश कडलग, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत अहेर यांनी दुसरी जाळी बिबट्यावर फेकत त्याला खाली पाडले. यावेळी वनकर्मचाºयांनी त्यास तत्काळ खाली फायबरच्या संरक्षक ढालीने दाबून धरले व पुन्हा भुलीचे औषध दिले.
‘याचि देही याचि डोळा’...
टोलेजंग बंगले, रो-हाउस, इमारतींचा उच्चभ्रू लोकवस्तीचा परिसर असलेल्या सावरकरनगर, शंकरनगर, शारदानगर, पामस्प्रिंग कॉलनी भागात शुक्रवारी (दि.२५) सकाळी बिबट्याचा थरार नागरिकांनी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवला.
शंकरनगर भागात बिबट्याने सर्वप्रथम नागरिकांना दर्शन दिले. तेथील मोकळ्या भूखंडातील गाजरगवताच्या आडोशाला बिबट्या लपून बसलेला असताना बघ्यांच्या गर्दीचा टोळका व त्यांच्याकडून होणारी आरडाओरड यामुळे बिबट्या बिथरला आणि बिबट्याने त्या मोकळ्या भूखंडांवरून बंगल्यांच्या दिशेने धाव घेतली.
दहा ते पंधरा फुटांच्या भिंती बिबट्याने सहज भेदत बंगल्यांच्या आवारात धुमाकूळ घातला. सपट व्हिला रो-हाउस, दीपज्योती, तथास्तू, मारवा हाउस या बंगल्यांच्या आवारात दडून बसण्याचा प्रयत्न करत असताना बिबट्याने चार लोकांवर हल्ला केला.
पोलीस कर्मचारी त्याच्यामागे लाठ्या-काठ्या घेऊन धावत जात होते. यामुळे बिबटला ‘ट्रॅन्क्यूलाइज’ करताना अडचणी आल्या. वनपरिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार यांनी दोनवेळा इंजेक्शन सोडले; मात्र एक इंजेक्शन बिबट्याला सुदैवाने लागल्यामुळे त्याची आक्रमकता भोवळ येऊन कमी झाली.
शारदानगर, सावरकरनगर, शंकरनगर, पामस्प्रिंग या भागात बिबट्याचा तीन तास थरार सुरू होता. सकाळी साडेआठ वाजेपासून या भागात ‘वाघ आला, वाघ आला’ अशी ओरड सुरू झाल्याने रहिवाशांची पाचावर धारण बसली होती. नागरिकांनी जीव मुठीत धरून घरांमध्ये दरवाजे लावून स्वत:ला कोंडून घेतले
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचा चमू कौशल्यपूर्ण पद्धतीने प्रयत्न करत होता. पोलीस दलाचे चांगले सहकार्य पथकाला मिळत होते. रेस्क्यू आॅपरेशनला बघ्यांच्या गर्दीमुळे मोठा अडथळा निर्माण झाला. गोंगाट अन् गोंधळामुळे बिबट्या अधिकच बिथरला परिणामी त्याने लोकांवर चाल केली. पोलीस, वनक र्मचारी, पत्रकार, छायाचित्रकार सावधगिरीने त्यांचे कर्तव्य पार पाडत असताना बघ्यांच्या गर्दीने सर्वांच्याच कार्यात अडथळे निर्माण केले. परिणामी रेस्क्यू आॅपरेशनला विलंब होत गेला आणि परिस्थिती गंभीर बनली.
- विजय शेळके, मुख्य वनसंरक्षक, वनविभाग, नाशिक
बिबट्या आमच्या बंगल्याच्या आवारात आल्याचे समजले तेव्हा आम्ही सगळे खूब घाबरलो. मुख्य दरवाजापासून सगळे दरवाजे, खिडक्या तत्काळ बंद करून घेतल्या. बिबट्या पंधरा मिनिटे बंगल्याच्या आवारात धुमाकूळ घालत होता; मात्र वनकर्मचाºयांनी मोठ्या धाडसाने व कौशल्याने त्याला बंदिस्त केले व आम्ही सुटकेचा नि:श्वास घेतला. -आशा मारवा, प्रत्यक्षदर्शी
बिबट्या बंगल्याकडे न जाता अचानक रस्त्याच्या दिशेने आला. ते मी बघितले आणि हातात काठी घेत त्याला भूखंडाच्या दिशेने हुसकण्यासाठी पुढे सरसावलो. कारण रस्त्यावर खूप लोक उभे होते, बिबट्या पुढे सरकला असता तर धावपळ व चेंगराचेंगरीदेखील झाली असती; मात्र बिबट्याने चाल केली व मला खाली पाडून जखमी केले. -संतोष गायकवाड, जखमी
बिबट्या मारवा हाउसमधून उडी घेऊन जेव्हा आमच्या तथास्तु बंगल्याच्या आवारात आला तेव्हा आम्ही सगळेच खूप घाबरू न गेलो. बिबट्या आल्याचे समजल्यामुळे अगोदरच बंगल्याचे दारे, खिडक्या बंद करुन घेत स्वत:ला कोंडून घेतले होते. हा सर्व थरार अंगाचा थरकाप उडवून गेला. जाळीमध्ये अडकल्यानंतरही तो स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी प्रयत्न करत होता. मोठा व प्रचंड ताकदीचा बिबट्या जवळून पहिल्यांदाच बघितला. -जय पटेल, प्रत्यक्षदर्शी, रहिवासी