सावरकरांच्या छायाचित्राचा अखेर अंदाजपत्रकात समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 06:25 PM2018-03-29T18:25:33+5:302018-03-29T18:25:33+5:30

भाजपाकडून झाले होते विस्मरण : अंदाजपत्रकाच्या प्रतींचे उशिराने वाटप

 Savarkar's photographs finally include the budget | सावरकरांच्या छायाचित्राचा अखेर अंदाजपत्रकात समावेश

सावरकरांच्या छायाचित्राचा अखेर अंदाजपत्रकात समावेश

Next
ठळक मुद्देसत्ताधारी भाजपाच्याच एका सदस्याने याबाबतचे पत्र देऊनही स्थायी समिती सभापतींनी त्याबाबत गांभीर्याने न घेतल्याने भाजपात धावपळ उडाली होती

नाशिक - महापालिकेच्या अंदाजपत्रकात अखेर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या छायाचित्राचा समावेश करण्यात आला आहे. सत्ताधारी भाजपाच्याच एका सदस्याने याबाबतचे पत्र देऊनही स्थायी समिती सभापतींनी त्याबाबत गांभीर्याने न घेतल्याने भाजपात धावपळ उडाली होती. अखेर, गुरूवारी (दि.२९) अंदाजपत्रकात तातडीने सावरकरांचे छायाचित्र समाविष्ट करण्यात आल्यानंतर सायंकाळी अंदाजपत्रकाच्या प्रती नगरसेवकांपर्यंत पोहोचविण्यास सुरूवात करण्यात आली,
महापालिकेच्या स्थायी समितीने आयुक्तांच्या अंदाजपत्रकात ११५ कोटींची भर घातल्यानंतर ते २७ मार्चला रात्री उशिरा छपाईसाठी लेखा विभागाला पाठविले. तत्पूर्वी, दि. २६ मार्च रोजी भाजपाचेच नगरसेवक योगेश हिरे यांनी स्थायी समिती सभापतींना पत्र देत अंदाजपत्रकात सावरकरांचे छायाचित्र समाविष्ट करण्याची मागणी केली होती. परंतु, सभापतींनी त्या पत्राबाबत गांभीर्याने दाखविले नाही. अंदाजपत्रक छपाईला गेल्यानंतर भाजपाच्याच सदस्याने दिलेल्या पत्राचे स्मरण स्थायीच्या अन्य सदस्यांना झाले आणि त्यांनी अंदाजपत्रक छपाई थांबवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, लेखा विभागाने त्याबाबत असमर्थता व्यक्त करत छायाचित्र समावेशाविषयी नगरसचिव विभागाकडून अभिप्राय मागविला. नगरसचिव विभागानेही त्याबाबत महासभाच निर्णय घेऊ शकते, अशी भूमिका घेतली. अखेर, सावरकरांचे छायाचित्र स्थायी समितीऐवजी महासभेच्या अंदाजपत्रकाच्या पुस्तिकेत टाकण्याचे ठरविण्यात आले. परंतु, पुन्हा निर्णय बदलण्यात येऊन गुरुवारी (दि.२९) सकाळी अंदाजपत्रकाचे बाईडिंग होण्यापूर्वी सावरकरांच्या छायाचित्राची स्वतंत्र छपाई करुन ते पुस्तिकेत समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे, अंदाजपत्रकाच्या पुस्तिकेत आता कुसुमाग्रजांबरोबरच सावरकरांचेही छायाचित्र झळकणार आहे.
अंदाजपत्रकाच्या प्रतींचे वाटप
सावरकरांचे छायाचित्र स्थायी समितीच्याच अंदाजपत्रकात समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने गुरुवारी (दि.२९) सायंकाळपर्यंत अंदाजपत्रकाच्या पुस्तिका नगरसचिव विभागापर्यंत पोहोचलेल्या नव्हत्या. संध्याकाळी उशिराने प्रती हाती पडल्यानंतर त्या नगरसेवकांच्या घरी पोहोचविण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली. येत्या ३१ मार्चला सकाळी ११.३० वाजता अंदाजपत्रकीय महासभा होणार असून त्यावेळी स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी अहेर या अंदाजपत्रक सादर करणार आहेत.

Web Title:  Savarkar's photographs finally include the budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.