सवर्णांचे आरक्षणही फसवे - प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 01:54 AM2019-01-14T01:54:03+5:302019-01-14T01:54:34+5:30
भाजपा सरकारने घेतलेले निर्णय त्यांच्यावरच उलटले असून, आर्थिक निकषांवर सवर्णांना दिलेले आरक्षण हेदेखील फसवे असल्याने २०१९च्या निवडणुकीत सवर्ण मतदारही भाजपाला त्यांची जागा दाखवून देतील, असे प्रतिपादन भारिप बहुजन संघाचे राष्टÑीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
नाशिक : भाजपा सरकारने घेतलेले निर्णय त्यांच्यावरच उलटले असून, आर्थिक निकषांवर सवर्णांना दिलेले आरक्षण हेदेखील फसवे असल्याने २०१९च्या निवडणुकीत सवर्ण मतदारही भाजपाला त्यांची जागा दाखवून देतील, असे प्रतिपादन भारिप बहुजन संघाचे राष्टÑीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
गोल्फ क्लब मैदान येथे वंचित बहुजन आघाडीच्या महाअधिवेशनात ते बोलत होते. व्यासपीठावर एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल, माजी आमदार लक्ष्मण माने उपस्थित होते.
आंबेडकर म्हणाले, सरकारचे प्रयत्न चाललेत की, दंगल घडवून आणावी परंतु ते जमले नाही. शहरी नक्षलवाद वाढतोय म्हणून सांगितले, तेही शक्य झाले नाही. भीमा कोरेगाव करून पाहिले तेथेही काही झाले नाही. तिहेरी तलाक कायदा आणला. यामुळे मुस्लीम समाज उठाव करेल, असे त्यांना अपेक्षित होते; परंतु हेही झाले नाही. यानुसारच आर्थिक निकषांवरील दहा टक्के आरक्षण आले, परंतु त्यांची खेळी त्यांच्यावरच उलटली असल्याचे ते म्हणाले. दहा टक्के आरक्षण द्यायचे हा भाजपाचा गेम प्लॅन होता, असा आरोप करताना अॅड. आंबेडकर म्हणाले, राज्यसभेत जेथे भाजपाचे बहुमत नाही तेथे हा प्रस्ताव फेटाळला जाईल आणि निवडणुकीत भाजपाला नवा मुद्दा मिळेल, या अपेक्षेने त्यांनी घटनादुरुस्तीचे विधेयक आणले, मात्र तेही मंजूर झाल्याने भाजपाची परिस्थिती ‘आ बैल मुझे मार’ अशी स्थिती झाल्याचे आंबेडकर म्हणाले. आरक्षण जाहीर करताना १ हजार फुटाचे घर आणि ८ लाखांच्या आत उत्पन्न या निकषात सवर्ण बसत नसल्याने त्याचा फायदा हा मुस्लिमांनाच अधिक होणार असल्याने आगामी निवडणुकीत सवर्ण भाजपाला त्यांची जागा दाखवून देतील, असे आंबेडकर म्हणाले.
आंबेडकर यांनी मोदी यांच्या धोरणावर टीका करताना भाजपामुळेच देशाची अवस्था बिघडल्याचा आरोप केला. या अगोदरच्या सरकारने रिझर्व्ह बॅँकेच्या गंगाजळीला हात लावला नव्हता. परंतु मोदी सरकार गंगाजळीला हात लावायला निघाले आहे. बॅँकेत ज्यांचे खाते आणि फिक्स डिपॉझिट आहे त्यांच्यासाठी ही गंगाजळी ही सुरक्षित व्यवस्था असते, ही व्यवस्थाच भाजपा मोडीत काढायला निघाले आहे. जीएसटी, नोटाबंदीच्या माध्यमातून देशाची अर्थव्यवस्था मोडकळीत आली आहे.
देशाला हिंदू धर्म आणि हिंदू राष्टÑ करण्याच्या नादात बिघडवू नका, असा सल्ला देतानाच पंतप्रधान, चीफ जस्टीस, राष्टÑपती, तीनही आर्मी चीफ हे धर्म कधीही सांगत नाही. पण ते हिंदूच असतात अशी परिस्थिती आजची आहे. देशाचा धर्म हिंदू असावा, असे सांगणारेच देश बुडवायला निघाले, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
बहुजन आघाडीने महाराष्टÑाचे राजकारण हादरले
राज्यभर होणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या लाखोंच्या सभांमुळे महाराष्टÑाचे राजकारण हादरले असून, ही आघाडी तोडण्याचे प्रयत्न राज्यकर्त्यांकडून केले जात आहेत, असा आरोप एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केला.