सावरकर यांच्या कार्याचा लखनौ विद्यापीठ अभ्यासक्रमात समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 19:58 IST2021-07-21T19:57:55+5:302021-07-21T19:58:59+5:30
नाशिक : उत्तर प्रदेशातील लखनौ विद्यापीठातील पदवीपूर्व अभ्यासक्रमातील राज्यशास्त्र विषयात नाशिकनजीकचे भगूर ही जन्मभूमी असलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांचा आणि कार्याचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, मानवेंद्रनाथ रॉय, राम मनोहर लोहिया आणि चौधरी चरणसिंह यांच्याही कार्याचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.

सावरकर यांच्या कार्याचा लखनौ विद्यापीठ अभ्यासक्रमात समावेश
नाशिक : उत्तर प्रदेशातील लखनौ विद्यापीठातील पदवीपूर्व अभ्यासक्रमातील राज्यशास्त्र विषयात नाशिकनजीकचे भगूर ही जन्मभूमी असलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांचा आणि कार्याचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, मानवेंद्रनाथ रॉय, राम मनोहर लोहिया आणि चौधरी चरणसिंह यांच्याही कार्याचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.
नव्या शैक्षणिक धोरणानुसार चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी या नव्या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. हा बदल लखनौ विद्यापीठाच्या अकॅडमिक काउन्सिलकडून मान्यता मिळाल्यानंतर करण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या साहित्याचा अभ्यासक्रमात समावेश करावा आणि देशभरातील विविध विद्यापीठांमध्ये या साहित्याच्या अभ्यासाची दालने खुली करावीत, अशी मागणी यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने केंद्र सरकारकडे केली होती. त्यानंतर यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून हा बदल करण्यात आला आहे. राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या दोन्ही विषयांकडे भारतीय नजरेतून पाहण्यासाठी उजव्या आणि डाव्या विचारसरणीच्या विविध विचारवंतांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यशास्त्राच्या विषयामध्ये प्रथमच दोन उजव्या विचारधारेच्या नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक दीनदयाळ उपाध्याय यांचा समावेश त्यात करण्यात आला आहे. त्याबरोबच प्रथमच अर्थशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्येदेखील चौधरी चरणसिंह, राम मनोहर लोहिया आणि दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्वांसोबतच महात्मा गांधी यांचे विचारदेखील शिकवले जाणार आहेत. त्यामध्ये गांधीजींच्या स्वयंपूर्ण खेडी, विश्वस्ताचा विचार, साध्या राहणीवर आधारित आर्थिक विचार, सत्तेचे विकेंद्रीकरण, सहकार, समानता, अहिंसा आदी विचारांचा समावेश आहे.