पतंगाच्या दोऱ्यात अडकलेल्या कोकण घारीला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 05:36 PM2020-12-16T17:36:48+5:302020-12-16T17:37:31+5:30
चांदोरी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरातील निलगिरीच्या झाडावर पतंगाच्या दोऱ्यात अडकलेल्या कोकण घारीस वनविभागातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले आहे.
चांदोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात असलेल्या निलगिरीच्या झाडावर अंदाजे ७० फूट उंचीवर पक्षी अडकला असल्याचे जगदीश टर्ले या युवकाच्या लक्षात आले. त्याने गावातील आपत्ती व्यवस्थापन समितीला यासंदर्भात माहिती दिली. समितीचे सागर गडाख व विलास सूर्यवंशी हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सदर माहिती वनविभागाचे संजय भंडारी यांना दिली.त्यांच्या मार्गदर्शनाखाली वनसेवक भैय्या शेख हे घटनास्थळी आले.आपत्ती व्यवस्थापन समितीच्या स्वयंसेवकांनी झाडावर चढून पतंगाच्या दोऱ्यात अडकलेल्या कोकण घारीला सुरक्षितरित्या खाली आणून वनविभागाकडे सुपूर्द केले.त्यानंतर जखमी कोकण घारीस निफाड येथील रोपवाटिका केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वनविभागाच्या सतर्कतेमुळे एका पक्ष्यास जीवदान मिळाल्याने पक्षीमित्रांनी त्यांना धन्यवाद दिले.