वनविभागाचे 'रेस्क्यू ऑपरेशन' : विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 01:18 PM2020-07-24T13:18:56+5:302020-07-24T13:26:25+5:30

चाडेगाव शिवरस्ता सातपुते वस्तीजवळ असलेल्या अरिंगळे मळ्यात अडीच तास हे बचावकार्य सुरू राहिले. या बचावकार्यात काही सजग स्थानिक तरूणांनी पुढाकार घेतल्याचे दिसून आले.

Save the life of a leopard that fell into a well | वनविभागाचे 'रेस्क्यू ऑपरेशन' : विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

बिबट्या भक्ष्याच्या शोधात भटकंती करताना धोकादायक विहिरीत कोसळला

Next
ठळक मुद्देबिबट्या वारंवार बिथरत विहिरीत सैरावैरा पळत होताडरकाळ्यांमुळे बघ्यांच्या कपाळावरही घाम फुटला गावकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला

नाशिक : वेळ मध्यरात्रीची...ठिकाण चेहडी-चाडेगाव शिवरस्ता माऊलीनगर... सातपुते वस्तीजवळ असलेल्या अरिंगळे मळ्यातील एका कठडे नसलेल्या धोकादायक विहिरीत तीन वर्षांचा बिबट्या भक्ष्याच्या शोधात भटकंती करताना कोसळला. शुक्रवारी (दि.२४) सकाळी शेतकऱ्यांना बिबट्याच्या डरकाळ्या ऐकू आल्याने त्यांनी विहिरीत डोकावून बघितले असता विहिरीत बिबट्या बसलेला आढळला. घटनेची माहिती तत्काळ वनविभागाल कळविण्यात आली अन् सकाळी साडे सात वाजेपासून सुरू झाले ‘मिशन रेस्क्यू’ आणि दहा वाजता बचावकार्य यशस्वीपणे पुर्ण झाले.
दारणाकाठालगत मागील दोन महिन्यांपासून बिबट्यांची दहशत पसरली आहे. या वीस दिवसांत एकूण चार बिबटे जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले.


सोमवारी (दि.२१) पळसे गावात लावलेल्या पिंज-यात बिबट्याची एक लहान मादी जेरबंद झाली होती. या मादीचीही रवानगी बोरिवलीच्या संजय गांधी उद्यानात करण्यात आली आहे. अद्यापपर्यंत तीन बिबटे या उद्यानात मागील पंधरा दिवसांत पाठविले गेले आहे. तीन दिवसांचा कालावधी उलटत नाही, तोच पुन्हा चाडेगाव शिवारातील अरिंगळे मळ्याच्या विहिरीत बिबट्या पडल्याने वनविभागाच्या रेस्क्यू पथकाचे प्रमुख वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, वनपाल अनिल भालेराव, मधुकर गोसावी, वनरक्षक उत्तम पाटील, गोविंद पंढरे, राजेंद्र ठाकरे पेठ वनपरिक्षेत्राचे मोबाईल दक्षता पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पिंजरा, दोरखंड, जाळी, संरक्षक ढाली आदि साधनसामुग्री घेऊन चालक प्रवीण राठोड यांनी वन्यप्राणी रेस्क्यू व्हॅन घटनास्थळी पोहचविली. तत्काळ वाहनातून वनरक्षकांनी दोरखंड बांधून पिंजरा विहिरीत उतरविला आणि अवघ्या पाच मिनिटांत बिबट्याने विहिरीमधील एका बाजुने थेट पिंज-याच्या द्वाराजवळ उडी घेतली मात्र यावेळी बिबट्या पाण्यात पडला. वनरक्षकांनी पिंजरा अजून थोडा खाली सोडल्यानंतर बिबट्याने पोहत पिंजºयात प्रवेश केला अन् पिंज-याची झडप बंद झाली. तत्काळ एका स्थानिक तरूणाने थेट विहिरीत धरून ठेवलेल्या पिंजºयावर चढत दरवाजाला कुलूप ठोकले. पिंज-याच्या दरवाजाला कुलूप लावण्यात आले. विहिरीतून पिंजरा बाहेर काढताच जमलेल्या शेकडो गावकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. अडीच तास हे बचावकार्य सुरू राहिले. या बचावकार्यात काही सजग स्थानिक तरूणांनी पुढाकार घेतल्याचे दिसून आले. विहिरीच्या चौहोबाजूला दाट ऊसशेती असल्याने या भागात बिबट्यांचा वावर असल्याचे शेतक-यांनी सांगितले.

बिबट्याला बघण्यासाठी अरिंगळे मळा परिसरात जणू जत्राच भरली होती. बघ्यांच्या गर्दीमुळे बचावकार्यात अडथळे निर्माण झाले आणि बचाव कार्य दोन ते अडीच तासापर्यंत लांबले. बघ्यांचा आवाज अन् गोंगाटाने बिबट्या वारंवार बिथरत विहिरीत सैरावैरा पळत होता. अनेकदा त्याने डरकाळ्याही फोडल्या. डरकाळ्यांमुळे जमलेल्या बघ्यांच्या कपाळावरही घाम फुटला होता.

Web Title: Save the life of a leopard that fell into a well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.