आयुष्य सावरण्यासाठी तूच मायबाप...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:21 AM2018-06-17T00:21:16+5:302018-06-17T00:21:16+5:30
जगभर फादर्स डे साजरा होत असताना, एकीकडे आई-वडिलांकडे हट्ट करून आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करून घेणारी विविध वयोगटातील मुले, तर दुसरीकडे लहान वयात निधन, घटस्फोट, घर सोडून निघून जाणे आदी विविध कारणांमुळे मातृछत्र हरपलेल्या मुलांचा तितक्याच मायेने वडिलांकडून होणारा सांभाळ, संगोपन पहायला मिळते.
नाशिक : जगभर फादर्स डे साजरा होत असताना, एकीकडे आई-वडिलांकडे हट्ट करून आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करून घेणारी विविध वयोगटातील मुले, तर दुसरीकडे लहान वयात निधन, घटस्फोट, घर सोडून निघून जाणे आदी विविध कारणांमुळे मातृछत्र हरपलेल्या मुलांचा तितक्याच मायेने वडिलांकडून होणारा सांभाळ, संगोपन पहायला मिळते. आईची कमतरता जाणवणार नाही इतक्या मायेने, आपुलकीने त्यांची काळजी घेणारे पालक अर्थार्जनाची भूमिका पार पाडतानाच प्रसंगी स्वयंपाक करणे, मुलांचा अभ्यास घेणे, त्यांच्या वाटचालीवर लक्ष ठेवणे, त्यांच्यावर चांगले संस्कार करणे या गोष्टीही करताना दिसत आहेत. जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी यांनी दुसऱ्या लग्नाचा सल्ला दिला तरी आपल्या मुलांना प्राधान्य देत, त्यांच्यासाठी सगळे आयुष्य व्यतीत करण्याचा निर्णय घेऊन आणि तो तितक्याच आत्मीयतेने पूर्ण करण्यावर ही मंडळी भर देताना दिसतात. ‘फादर्स डे’ निमित्त अशा अनोख्या बापलेकरांच्या जगात डोकावण्याचा प्रयत्न वेगळीच अनुभूती देणारा ठरला.
आई-बाबांच्या लग्नाला पंधरा वर्षं पूर्ण झाली आणि त्याच वर्षात माझ्या डोक्यावरचा मातृछत्राचा आधार हिरावला गेला. २०१५ मध्ये अचानक माझी आई आजारी पडली. दवाखान्यात दाखल केले मात्र उपचारांना यश आले नाही. आईचे निधन झाले. तेव्हापासून वडील हेच आई आणि वडील या दोन्ही भूमिका निभावत आहेत. द्वारका येथील एका खासगी कार्यालयात ते अकाउंटंट म्हणून कार्यरत आहेत. बाबांसाठी मी आणि माझ्यासाठी बाबा असे आता आमचे घट्ट नाते तयार झाले आहे. बाप म्हणून ते माझी काळजी घेताना मुलगी म्हणून मलाही त्यांची काळजी घेताना आनंद वाटतो, समाधान वाटते. मी यंदा दहावीची परीक्षा दिली. चांगल्या गुणांनी ती पासही झाले. मी गाण्याच्या दोन परीक्षाही दिल्या आहेत. मला पुढे खूप शिकायचे आहे. स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणे आणि त्याद्वारे आईला ते यश समर्पित करणे हे माझे ध्येय आहे. - अक्षदा कुलकर्णी
गायक, वादक असे कलावंतांचे हसतेखेळते कुटुंब म्हणून आमच्या कुटुंबाची ओळख आहे. आईवडील दोघांनाही गायन, वादन, निवेदनाची आवड होती. याशिवाय आई टायपिंग संस्थाही चालवायची. १९९८ साली एका गंभीर आजाराने माझ्या आईचे निधन झाले. तेव्हा मी १८, तर लहान भाऊ केवळ १४ वर्षांचा होता. आईच्या पश्चात बाबा (श्याम पाळेकर) यांनी सगळे कुटुंब सावरले. ते बॉश कंपनीतून सेवानिवृत्त झाले आहेत. आईच्या पश्चात नोकरी, कलेची जोपासना, कौटुंबिक जबाबदाºया अशा सगळ्याच आघाड्या ते ताकदीने पेलत होते. स्वयंपाक येत असल्याने ते स्वयंपाकही करत होते. आम्हा मुलांच्या गरजा पूर्ण करण्यावर त्यांचा भर असायचा. आज मी गायनासह ढोलकी, ढोलक वादन करतो. सांस्कृतिक क्षेत्रात जे काही थोडेबहुत नाव कमवून आहे ते दोघांच्या परिश्रमाचे फळ आहे. - अमोल पाळेकर
आई, बाबा, भाऊ आणि मी असे आमचे चौकोनी कुटुंब सुखात नांदत असताना दहा वर्षांपूर्वी माझ्या आईचे निधन झाले. अचानक आजारी पडली. गंभीर आजाराचे निदान झाले. त्यामुळे आमचे संपूर्ण कुटुंबच हादरून गेले होते. त्यानंतर दवाखान्यात दाखल केले, अनेक प्रकारचे उपचार केले; मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. हे दु:ख बाजूला ठेवत वडिलांनी (सुनील सोनजे) त्यांचे सारे लक्ष आम्हा दोघांवर केंद्रित केले. मुलांना वाढवायचे, शिकवायचे हा निर्धार करून ते कामाला लागले. आज मी पदवीचे शिक्षण घेते आहे, तर माझा भाऊ दहावीला आहे. माझे बाबा पूर्वी भाजीचा गाडा घेऊन शहरभर फिरायचे. आमच्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता सतत काम केले. आता मात्र वय झाल्याने, पायदुखीमुळे एकाच ठिकाणी गाडी उभी करून भाजी विकतात. आईच्या पश्चात मुलांना चांगल्या रीतीने वाढवणारा बाप म्हणून त्यांचा साºयांनाच अभिमान वाटतो. - अश्विनी सोनजे
साधारणत: आठ वर्षांपासून मी माझ्या वडिलांबरोबर राहतो. आई व वडील दोघेही एकत्र राहत नसले तरी आईची व माझी नियमित भेट होत असते. ती माझ्या अभ्यासाचा, खेळाचा, माझ्या प्रगतीचा आढावा घेत असते. माझ्या बाबांबरोबरचे माझे नाते पहिल्यापासून फार जिव्हाळ्याचे आहे. लहानपणापासून आईवडील दोघांनी मला प्रेमाने वाढवले, घडवले. पण गेल्या आठ वर्षांपासून माझ्या जडघडणीत पूर्णवेळ साथ देण्याचे श्रेय माझ्या वडिलांना जाते. ते प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आहेत. आज ते ‘प्रथम’ संस्थेत काम करत आहेत. मी सध्या बीकॉम करतो आहे आणि आंतरराष्टÑीय पातळीवर बॅडमिंटन खेळतो. माझ्या खेळात सातत्याने सुधारणा कशी होईल, स्पर्धा जिंकण्यात मी नेहमी यशस्वी कसा होईल याचा त्यांना ध्यास असतो. - अमन फरोग संजय