‘आपट्याचे संवर्धन क रूया, निसर्गाचं ‘सोनं’ सुरक्षित ठेवूया...’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 04:02 PM2018-10-18T16:02:54+5:302018-10-18T16:05:39+5:30
नाशिक : ‘बहुगूणी आपटा कांचन वाचवूया, निसर्गातील ‘सोनं’ सुरक्षित ठेवूया..’, ‘ झाडे-झुडुपे देती शुध्द हवा... सोन्यासाठी त्याचा हट्ट का ...
नाशिक: ‘बहुगूणी आपटा कांचन वाचवूया, निसर्गातील ‘सोनं’ सुरक्षित ठेवूया..’,
‘ झाडे-झुडुपे देती शुध्द हवा... सोन्यासाठी त्याचा हट्ट का हवा? वृक्ष ओरबाडणे थांबवूया, प्राणवायू वाढवूया...’ अशा एकापेक्षा एक शुभेच्छा संदेशांच्या माध्यमातून सोशल मिडियावर एकप्रकारे विजयादशमीला निसर्ग संवर्धनविषयी प्रबोधनाचा जागर नाशिककरांना अनुभवयास आला.
विजयादशमीनिमित्त शुभेच्छा संदेशांचा सोशल मिडियावर जणू पूर आला आला होता. यामध्ये काही संदेश औपचारिकता पुर्ण करणारे तर काही औपचारिकता अन् प्रबोधन करणारे होते. ‘आपट्याची पाने देण्यापेक्षा फक्त विनम्रतेने हात जोडून म्हणा शूभ दसरा...’, ‘नको मला झाडाची तुटलेली पाने, तुमची साथ राहू द्या आयुष्यभर हेच माझ्यासाठी दसऱ्याचे सोने...’ अशा शुभेच्छापर संदेशांची देवाणघेवाण नेटिझन्स्कडून करण्यात आली. या संदेशांच्या माध्यमातून निसर्गातील ‘वनराज’म्हणून ओळखला जाणारा ‘आपटा’ सुरक्षित रहावा, हाच उद्देश. आपट्याच्या झाडाला आयुर्वेदात अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त आहे. खडकाळ, मुरूमाड भागात सहजरित्या वाढणारा व वनीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा आपटा हा महावृक्ष म्हणूनही ओळखला जातो. आपट्याला ‘अश्मंतक’ या नावानेही ओळखले जाते. हा वृत्र कफदोष निवारणासह मुतखड्यावरही गुणकारी औषध आहे.
आपट्याची पानांऐवजी रोपे देण्याची गरज
आपट्याची पाने वाटण्याची प्रथा दस-याला आहे. या प्रथेमागे एक पौराणिक कथा सांगितली जाते. आपट्यासारखा महत्त्वाचा वृक्ष हा तसा दुर्मीळ होत चालला आहे. दस-याला पारंपरिक प्रथेमध्ये काळानुरूप थोडासा बदल करत प्रत्येकाने निसर्गसंवर्धनासाठी आपट्याची पाने भेट देण्याऐवजी रोपटे भेट देत नवा आदर्श समाजापुढे ठेवावा, असे मत पर्यावरणप्रेमींसह वनौषधी अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. आपट्याचे झाड सहजरित्या वाढते.
आपटा सांगून कांचनची विक्री
दस-याच्या मुहूर्तावर बाजारात विक्रीसाठी दाखल झालेली पाने आपट्याची नसून कांचन वृक्षाची होती. आपटा आणि कांचन या दोन्ही वृक्षांच्या पानांमध्ये बरेच साम्य आहे. कांचनची पाने आपट्याच्या पानांच्या तुलनेत आकाराने मोठी असतात. त्यामुळे कांचनच्या पानांची विक्री मोठ्या प्रमाणावर दस-याच्या दिवशी ठिकठिकाणी होताना दिसून आली. कांचनवृक्ष शहराजवळच्या परिसरात आढळून येतो. आपटा कांचनच्या तुलनेत तसा कमी आढळतो. त्यामुळे बहुतांश विक्रेत्यांनी कांचनची पाने नागरिकांना आपट्याची पाने सांगून विक ली. एकूणच आपटा आणि कांचन हे दोन्ही वृक्ष विजयादशमीला ओरबाडले जात आहेत. या दोन्ही वृक्षांची निसर्गातील जैवविविधतेसाठी मोठी गरज असल्याचे पर्यावरणप्रेमींनी सांगितले.