पावसाने केली कृपा, अडीच कोटींची बचत
By admin | Published: July 17, 2016 12:28 AM2016-07-17T00:28:17+5:302016-07-17T00:28:56+5:30
धरणसाठ्यात वाढ : पंपिंग मशिनरीचा ठेका रद्द
नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात घट झालीच तर जून-जुलै महिन्यांत पाणी उपसा करण्यात अडचणी उद्भवू नये, याकरिता महापालिकेने पंपिंग मशिनरी भाडेतत्त्वावर घेण्यासाठी तब्बल दोन कोटी ४१ लाख रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीकडून मंजूर करून घेतला होता. परंतु सुदैवाने, गेल्या आठवड्यात वरुणराजाची कृपा झाली आणि भरभरून पाऊस बरसला. त्यामुळे गंगापूर धरणातील पाणीसाठा तब्बल ६६ टक्क्यांवर जाऊन पोहोचल्याने पंपिंग मशिनरीचा ठेका रद्द करण्यात आला असून महापालिकेची अडीच कोटींची बचत झाली आहे.
गंगापूर धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत चालल्याने एप्रिल-मे महिन्यात महापालिकेच्या चिंता वाढल्या होत्या. जून-जुलैमध्ये पुरेसा पाऊस न पडल्यास गंगापूर धरणातून पाणी उपसा करणे अडचणीचे ठरणार होते. ऐनवेळी पाणी उपसा करण्यासाठी अडचणी उद्भवू नयेत यासाठी महापालिकेने अगोदरच त्यासाठी लागणारी यंत्रणा सज्ज ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, गंगापूर धरणातून इनटेक वेलपर्यंत रॉ वॉटर पुरेशा प्रमाणात घेण्याकरिता आवश्यक पंपिंग मशिनरी भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाकडून मे महिन्यात स्थायी समितीवर मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. त्यासाठी सुमारे दोन कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. तर गंगापूर धरणातीलच पंपिंग स्टेशन येथे डिवॉटरिंग पंपासाठी तात्पुरत्या स्वरूपात वीजपुरवठा घेण्याकरिता ४१ लाख रुपये खर्च प्रस्तावित होता. सदर प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली होती. या प्रस्तावानुसार अहमदाबाद येथील अॅक्वा एजन्सी या कंपनीला काम देण्यासंबंधी करारनामा करण्यात आला होता. सदर कंपनीकडून प्रतिदिन ३० कोटी लिटर्स पाणी गंगापूर धरणातील बॅक वॉटरमधून पंप करून ते जॅकवेलमध्ये आणून टाकले जाणार होते. त्यासाठी लागणाऱ्या डिझेल अथवा वीजबिलाचा खर्च संबंधित कंपनीनेच भरण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. जून आणि जुलै महिन्यात पाऊस न आल्यास दोन महिन्यांसाठी सदर काम देण्यात येणार होते. आठवडाभरापूर्वीच गंगापूर धरणातील पाणीसाठा १५ टक्क्यांपर्यंत जाऊन खालावल्याने महापालिकेकडून सदर पंपिंग मशिनरीच्या ठेक्याबाबत कार्यादेश देण्याची तयारी सुरू करण्यात आली होती. परंतु गेल्या रविवारी (दि. १०) वरुणराजाची कृपा झाली आणि पाऊस भरभरून कोसळल्याने गंगापूर धरणातील पाणीसाठा दोन दिवसातच ४७ टक्क्यांवर जाऊन पोहोचला. त्यामुळे आपसूकच बॅक वॉटरमधून पाणी उपसा करण्याचा ठेकाही रद्द झाला. पावसामुळे महापालिकेच्या अडीच कोटी रुपयांची बचत होऊ शकली आहे. (प्रतिनिधी)