उन्हाच्या दाहकतेपासून बचावासाठी फळबागांवर साड्यांचे आच्छादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 05:07 PM2019-05-30T17:07:47+5:302019-05-30T17:09:15+5:30
सिन्नर : तालुक्यातील पूर्व भागात उन्हाची दाहकता वाढल्याने याचा परिणाम जनसामान्यांबरोबरच फळबागांवरही होऊ लागला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाऊ नये म्हणून वावी, खोपडी, कहांडळवाडीतील अनेक शेतकऱ्यांनी फळबागावर रंगीबेरंगी साड्यांचे आच्छादन टाकल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
कडक उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी वावी येथील शेतकरी शंकर रसाळ, जगन रसाळ यांनी नऊशे डाळिंब झाडांना पंधराशे साड्यांचे आच्छादन टाकले आहे. एका झाडाला एक ते दीड साठी वापरली असून साड्या सिन्नर, विंंचूर, संगमनेर बाजारपेठेतून खरेदी केल्या आहेत. त्यांना या अच्छादनासाठी तेवीस हजार रूपये खर्च आला असून फळबागांचे तीव्र उन्हापासून संरक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे.
वावी परिसरात अके शेतकऱ्यांकडे फळबागा आहेत. त्यापैकी काही फळबागा पाण्याअभावी करपल्या, तर काही फळबागा वाचविण्यासाठी झाडांना सावली करणे, झाडांच्या खोडाजवळ पाचट टाकणे, पाणी रात्री देणे, झाडांची छाटणी करून झाडावरील बोजा कमी करणे आदी विविध उपायात्मक योजना राबवून शेतकरी फळबागा वाचविण्यासाठी धडपडत आहेत.
तालुक्यात फळबागांचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने अनेक फळबागा संपुष्टात आल्या आहेत. ज्या शेतक-यांनी दुष्काळी परिस्थितीवर मात करून फळबागा जगवल्या, फळबागांवर उष्णतेचा परिणाम होऊ नये म्हणून शेतक-यांनी डाळिंबाच्या झाडांवर साड्यांचे आच्छादन टाकले आहे.