हरी म्हणा...  कुणी गोविंद म्हणा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 01:13 AM2018-11-11T01:13:40+5:302018-11-11T01:14:01+5:30

‘हरी म्हणा, कुणी गोविंद म्हणा’, ‘घेई छंद मकरंद’ यासह नाशिकचे भूमिपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या रचनांच्या माध्यमातून भरतस्वरांचा दरवळ नेहरूचौकातील पिंपळपारावर पसरला आणि नाशिककरांची दिवाळी पाडवा पहाट मास्टर दीनानाथांच्याही स्मृतींनी सुगंधित झाली. ‘संस्कृती’ या संस्थेच्या वतीने आयोजित या पाडवा पहाट मैफलीला दरवर्षीप्रमाणे यंदाही रसिक श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 Say green ... someone say Govind ..! | हरी म्हणा...  कुणी गोविंद म्हणा..!

हरी म्हणा...  कुणी गोविंद म्हणा..!

googlenewsNext

नाशिक : ‘हरी म्हणा, कुणी गोविंद म्हणा’, ‘घेई छंद मकरंद’ यासह नाशिकचे भूमिपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या रचनांच्या माध्यमातून भरतस्वरांचा दरवळ नेहरूचौकातील पिंपळपारावर पसरला आणि नाशिककरांची दिवाळी पाडवा पहाट मास्टर दीनानाथांच्याही स्मृतींनी सुगंधित झाली. ‘संस्कृती’ या संस्थेच्या वतीने आयोजित या पाडवा पहाट मैफलीला दरवर्षीप्रमाणे यंदाही रसिक श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  डॉ. भरत बलवल्ली यांनी अतिशय अवघड अशा रागमालेने सुरुवात केली. राग हिंडोलपासून सुरू झालेला हा प्रवास पुरीया कल्याण, भूप, जौनपुरी, भूपाली, छायानट, मालकंस, मरमतसारंग, सारंग भैरवी, खरहर आणि पुन्हा हिंडोलपर्यंत येऊन थांबला. बलवल्ली यांनी २० रागांचा परिचय करून देत श्रोत्यांना आनंददायी प्रवास घडविला. भरत यांनी सालग वराळी या रागात एक बंदिश सादर केल्यानंतर ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातील ‘छेई छंद मकरंद’ हे पद खास आपल्या शैलीत पेश करत उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळविली. पिंपळपार आणि अभिनव भारत मंदिर याबाबत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे असलेले नाते आणि स्थानमहात्म्य लक्षात घेत भरत बलवल्ली यांनी सावरकरांच्याही काही रचना सादर करत त्यांना मानवंदना दिली. रणदुदुंभी नाटकातील ‘दिव्य स्वातंत्र्य रवी’ हे मालकंस रागातील नाट्यपद सादर करतानाच ‘शूरा मी वंदिले’, ‘शतजन्म शोधितांना’ या रचनांनी श्रोत्यांना खिळवून ठेवले. शुद्ध सारंग रागात संत चोखामेळा यांची ‘सुखाचे ते सुख चंद्रभागेतटी’ ही रचनाही मंत्रमुग्ध करणारी ठरली. चैतन्यस्वरांच्या या मैफलीला साथसंगत दादा परब (पखवाज), पंडित विश्वनाथ कान्हेरे (आॅर्गन), प्रसाद करंबळेकर (तबला) आणि सागर साठे (सिंथेसायझर) या कलावंतांनी केली. मैफलीचे सुंदर निवेदन मोहन कान्हेरे यांनी केले.
बाळासाहेब वाघ, रवींद्रकुमार सिंगल सन्मानित
क. का. वाघ शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांना ‘संस्कृती’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याचबरोबर पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांना आयर्नमॅनचा किताब मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी, संस्कृतीचे अध्यक्ष व नगरसेवक शाहू खैरे यांच्यासह आमदार हेमंत टकले, आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, बीएसएनएलचे वरिष्ठ महाप्रबंधक नितीन महाजन, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, माजी आमदार विलास लोणारी, मनपातील विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, दिल्ली ‘लोकमत’चे संपादक सुरेश भटेवरा, डॉ. कैलास कमोद, वसंत गिते, गुरुमित बग्गा आदी उपस्थित होते.

Web Title:  Say green ... someone say Govind ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.