सयाजीराव गायकवाड ‘भारतरत्न’चे हक्कदार- राजमाता शुभांगिनीराजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2021 06:02 AM2021-12-05T06:02:05+5:302021-12-05T06:02:39+5:30
मराठी साहित्य संमेलनात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात आयोजित प्रकाशन मंचचे उद्घाटन व महाराष्ट्र शासनाच्या महाराजा गायकवाड चरित्र साधन प्रकाशन समितीच्या वतीने महाराजांवरील ५० ग्रंथांचे प्रकाशन शुभांगिनीराजे गायकवाड यांच्या हस्ते झाले.
धनंजय वाखारे
नाशिक : महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घडविणारे महाराजा सयाजीराव गायकवाड हे सुद्धा भारतरत्नचे हक्कदार आहेत. शासनकर्त्यांनी त्यासाठी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा महाराजांच्या पणतूसून व बडोदा येथील महाराजा गायकवाड विद्यापीठाच्या कुलपती राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड यांनी व्यक्त केली.
मराठी साहित्य संमेलनात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात आयोजित प्रकाशन मंचचे उद्घाटन व महाराष्ट्र शासनाच्या महाराजा गायकवाड चरित्र साधन प्रकाशन समितीच्या वतीने महाराजांवरील ५० ग्रंथांचे प्रकाशन शुभांगिनीराजे गायकवाड यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर संमेलनाचे स्वागताध्यक्ष व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, चरित्र साधन प्रकाशन समितीचे सदस्य सचिव बाबा भांड, उच्चशिक्षण संचलनालयाचे संचालक डॉ. धनराज माने उपस्थित हाेते.
शुभांगिनीराजे गायकवाड म्हणाल्या, आधुनिक भारताच्या जडणघडणीत महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. ते प्रजावंत सुशासक होते. त्यांचा अनमोल वैचारिक वारसा पुढे नेण्याचे काम महाराष्ट्र सरकार करत आहे. त्यांच्या ग्रंथांमधून महाराजांची नव्याने ओळख होणार असून, हे काम राष्ट्रस्तरावरही झाले पाहिजे. नाशिक जिल्ह्याचे सुपुत्र असलेल्या महाराजांनी समाजाच्या सर्वच घटकांसाठी केलेले काम दिशादर्शक आहे. जो अनेकांचा पोशिंदा राहिला त्याचे साहित्य मात्र अनेक वर्षांपासून प्रकाशित होऊ शकले नव्हते. महाराष्ट्र सरकारने त्याबाबत घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी महात्मा फुले यांचे विचार अंमलात आणणारा हा राजा होता. त्यांचा विचार पोहोचविण्याचे काम विविध माध्यमांतून केले जाईल, अशी ग्वाही दिली. समितिचे सदस्य सचिव बाबा भांड यांनी ५० ग्रंथ प्रकाशनामागची भूमिका विशद केली.
उदय सामंत यांची ऑनलाइन उपस्थिती
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधन प्रकाशन समितीचे अध्यक्ष उदय सामंत हे विमानात बिघाड झाल्यामुळे नाशिकला पोहोचू शकले नाहीत. त्याऐवजी त्यांनी ऑनलाइन हजेरी लावत उपस्थितांशी संवाद साधला.