राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत सायली वाणीला दोन कांस्य
By धनंजय रिसोडकर | Published: December 15, 2023 03:12 PM2023-12-15T15:12:13+5:302023-12-15T15:13:01+5:30
राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत महिला गटाचे पदक पटकावणारी सायली ही नाशिकमधील पहिली खेळाडू ठरली.
नाशिक : हरियाणातील पंचकुला येथे चालू असलेल्या यूटीटी राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या सायली वाणीने महिला व १९ वर्षाखालील मुलींच्या गटात असे दोन कांस्यपदके मिळविली. राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत महिला गटाचे पदक पटकावणारी सायली ही नाशिकमधील पहिली खेळाडू ठरली.
महिला गटात तीने उपउपांत्यपूर्व फेरीत दिल्लीच्या सायनीका माजी या खेळाडूचा ३-१ ने पराभव करून सायलीने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत सायलीने हरियाणाच्या अंजली रोहिलाचा अटीतटीच्या लढतीत ३-२ ने पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत तीची गाठ पडली ती या स्पर्धेतील दुसरी मानांकित अहिक्या मुखर्जी बरोबर. या सामन्यात तिने चांगली झुंज दिली परंतु अनुभवी अहिक्यासमोर तीला ४-० ने पराभवास सामोरे जावे लागले. त्यामुळे सायलीला महिला गटाचे कांस्यपदक आपल्या नावे केले.
१९ वर्षाखालील मुलींच्या गटात सायलीने उपउपांत्यपूर्व फेरीत तामिळनाडूची काव्याश्री भास्कर हिचा ३-२ असा पराभव करुन उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत तिने महाराष्ट्राच्या अनन्या चांदेचा ३-१ ने पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीतील सामन्यात तीचा महाराष्ट्राच्या पृथा वर्टिकर ने ४-० असा पराभव केल्यामुळे सायलीला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. अश्या रीतीने तीने या स्पर्धेत दोन कांस्य पदके पटकावली. जय मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली ती सराव करीत आहे.