थकबाकीदारांचे दणाणले धाबे
By admin | Published: March 23, 2017 12:04 AM2017-03-23T00:04:30+5:302017-03-23T00:04:43+5:30
सटाणा : येथील नगरपालिका प्रशासनाने विविध कर थकबाकीदारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मालमत्ता सील केल्यानंतर थकबाकीदारांच्या नावाच्या यादीचे होर्डिंग्ज विविध चौकांत लावण्यात आले आहेत.
सटाणा : येथील नगरपालिका प्रशासनाने विविध कर थकबाकीदारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मालमत्ता सील केल्यानंतर थकबाकीदारांच्या नावाच्या यादीचे होर्डिंग्ज विविध चौकांत लावण्यात आले आहेत. त्यामुळे थकबाकी वसुलीस चांगला प्रतिसाद मिळत असून, शासनाने याबाबत सक्तीने कार्यवाही चालू ठेवून शंभर टक्के उद्दिष्ट गाठण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने आता थकबाकीदारांच्या घरांसमोर ढोलताशे वाजविण्याचा इशारा दिला आहे. यामुळे थकबाकीदारांचे धाबे चांगलेच दणाणले असून, रांगा लावून थकबाकी भरण्यासाठी मालमत्ता-धारकांनी अक्षरश: गर्दी केली आहे.
शहरात घरपट्टी, पाणीपट्टी व व्यापारी संकुल तसेच प्लॉटधारकांकडे विविध प्रकारच्या करांची थकबाकी आहे. वसुलीसाठी पालिका प्रशासनातर्फेवारंवार तगादा लावूनही थकबाकीदार दादच देत नसल्याचा वर्षानुवर्षांचा पूर्वानुभव आहे. त्यामुळे शासननिर्देशानुसार करवसुलीसाठी पालिकेने यावर्षी अधिक सक्तीने कार्यवाही करण्याची मोहीम हाती घेतली आहे. पालिका मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी अधिकारी व कर्मचारीवर्गासह प्रसंगी पोलीस बंदोबस्त सोबत घेऊन धडक वसुली सुरू केली आहे.
प्रारंभी नोटिसा बजावून नळजोडणी कट करण्यात आली. त्यानंतर मालमत्ता सील करण्यात आल्या आणि अखेर थकबाकीदारांच्या नावांचे होर्डिंग शहरभर चौकाचौकांत लावण्यात आले. पालिकेने अचानक व अनपेक्षितपणे उचलल्या पावलामुळे थकबाकीदार फलकावर नावे आल्यानंतर करवसुलीस चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. थकबाकी वसुलीत कसूर न करता अधिकाधिक प्रभावीपणे कार्यवाही करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून आता थकबाकीदारांच्या घरांसमोर ढोलताशे वाजविण्याचा इशारा देण्यात आला असून, ३१ मार्चअखेरपर्यंत थकबाकी भरणा न केल्यास कायदेशीर कारवाईदेखील करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. (वार्ताहर)