२५ लाखाच्या लॉटरीचे आमीष दाखवून महिलेला २७ लाखांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 08:22 PM2018-08-23T20:22:41+5:302018-08-23T20:28:44+5:30
भामट्याने लॅमरोडवरील संसरीनाका देवळाली कॅम्प येथील एका महिलेला चक्क २६ लाख ९५ हजारांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे
नाशिक : ‘तुम्हाला २५ लाखांची लॉटरी लागली आहे, साईनिंग अमाऊंट भरावी लागेल’ असा मोबाईलवर संपर्क करत संवाद साधून एका भामट्याने लॅमरोडवरील संसरीनाका देवळाली कॅम्प येथील एका महिलेला चक्क २६ लाख ९५ हजारांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संसरीनाक्यावरील रहिवासी मोना फारुख इराणी (५४) यांच्याशी एका अज्ञात इसमाने भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. २५ लाखांच्या लॉटरीचे आमीष दाखविले आणि ‘साईनिंग अमाऊंट’च्या नावाखाली रक्कम भरण्यास भाग पाडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ८ एप्रिल २०१३ ते २२ आॅगस्ट २०१८पर्यंत इंटरनेटद्वारे फसवणूक केल्याचे इराणी यांनी सांगितले. या दरम्यानच्या कालावधीत अज्ञात इसमाने त्यांच्याशी वेळोवेळी संपर्क करुन रक्कम भरण्यास सांगितली. या सहा वर्षांच्या कालावधीत सुमारे २६ लाख ९५ हजार १६९ रुपयांना त्या भामट्याने गंडविल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. संशियताने सांगितल्याप्रमाणे दहा हजारांपासून ते तीन लाखांपर्यंतची रक्कम त्याच्या बॅँक खात्यावर जमा केली. इराणी यांचा हॉटेलचा व्यवसाय असून त्यांच्या दोन मुली विदेशात स्थायिक आहे, त्या येथे आपल्या पतीसमवेत राहतात. भामट्याने त्यांचा विश्वास संपादन करुन आणि २५ लाखांच्या लॉटरीचे आमीष दाखवत वेळोवेळी पैसे उकलले. मोना यांच्याकडे त्याच्या बॅँक खात्यात भरणा करण्यासाठी पैसे शिल्लक न राहिल्याने त्यांनी घरातील दागिणेही विकले तसेच मुलींकडूनही काही रक्कम घेतली. एकूण आतापर्यंत त्यांनी २६ लाख ९५ हजार १६९ रुपये बॅँक खात्यात जमा केली आहे. त्यानंतर इराणी यांनी भामट्यासोबत संवाद साधत लॉटरीच्या रकम देण्याबाबत आग्रह केला असता, त्याने त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत त्यांचे फोन घेण्यास टाळाटाळ करण्यास सुरूवात केली.आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांना मोठा मानसिक धक्का बसला. तत्काळ त्यांनी नाशिक सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.
पैसे भरल्याच्या ८६ पावत्या
त्या भामट्याने दिलेल्या बॅँकेच्या खातेक्रमांकावर वेळोवेळी विविध रक्कम जमा केल्याच्या सुमारे ८६ पावत्या इराणी यांच्याकडे आहे. २५ लाखांची लॉटरी लागल्याचे सांगून २७ लाख रुपयांना भामट्याने गंडा घातल्याने इराणी यांना संंताप झाला आहे.