उद्यान विभागात पुन्हा घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:39 AM2019-07-20T00:39:53+5:302019-07-20T00:42:01+5:30
माजी उद्यान अधीक्षकांच्या काळातील बारा कोटींचा उद्यान घोटाळा मार्गी लागत नाही तोच सध्याच्या कारकिर्दीतही मजूर सोसायट्यांना मर्यादेपेक्षा अधिक रकमेची कामे दिल्याचा घोटाळा उघड झाला आहे.
नाशिक : माजी उद्यान अधीक्षकांच्या काळातील बारा कोटींचा उद्यान घोटाळा मार्गी लागत नाही तोच सध्याच्या कारकिर्दीतही मजूर सोसायट्यांना मर्यादेपेक्षा अधिक रकमेची कामे दिल्याचा घोटाळा उघड झाला आहे. उद्यान विकासाच्या दोन कामाची निविदा काढताना ५० लाख रुपयांची नोंदणी असणाऱ्या ठेकेदार मजूर सोसायटीत ५३ लाख रुपये, तर १५ लाखांची नोंदणी करणाºया मजूर सोसायटीस १८ लाखाचे काम देण्यात आल्याचा गंभीर आरोप माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी शुक्रवारी (दि.१९) महासभेत केला. विशेष म्हणजे मंजूर नोंदणी क्षमतेपेक्षा अधिक रकमेचे काम देता येत नसल्याचे प्रशासनाने मान्य केल्याने आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी याप्रकरणाची अतिरिक्त आयुक्तांकडुन चौकशी करण्याचे तसेच यातील दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. महापौर रंजना भानसी यांनी या प्रकरणाची चौकशी अहवाल पुढील महासभेत सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
दरम्यान, या महासभेत शहरातील २८० उद्याने प्रभागनिहाय निविदा ३१ एजन्सींना दोन वर्षांसाठी देखभालीसाठी देण्याच्या कामाचे प्राकलन ८ कोटी ४२ लाख ७२ हजार रुपयांचे प्राकलन मंजूर करण्यात आले.
उद्यान विभागात सुरू असलेला गैरव्यवहार बडगुजर यांनी उघड केला. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त संदीप नलावडे यांनी निविदेत अशाप्रकारे अटी असल्याने मर्यादेपेक्षा जास्त कामे देता येत नसल्याचे स्पष्ट केले. या चर्चेत विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी या प्रकाराला जबाबदार कोण आणि संबंधितांवर काय कारवाई होणार याचा खुलासा करण्याची मागणी केली. यावर आयुक्तांनी यासंदर्भात अतिरिक्त आयुक्तांकडून चौकशी करण्यात येईल, असे सांगितले. दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे जाहीर केले.
स्मार्ट सिटीच्या वादावर विशेष महासभा
स्मार्ट सिटी कंपनीतील अधिकाऱ्यांची मनमानी आणि संशयास्पद व्यवहार यावर कॉँग्रेस नगरसेवक शाहू खैरे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर अल्पशी चर्चा झाली कंपनीच्या कारभारावर विशेष महासभा बोलविण्यात येईल, असे महापौर रंजना भानसी यांनी घोषित केले कंपनीचा कारभार दोन चार डोकी चालवत असल्याचा आरोप यावेळी गजानन शेलार यांनी केला, तर सभागृह नेता सतीश सोनवणे यांनीदेखील आरोपात तथ्य असल्याचे सांगितले.