नाफेडमध्ये घोटाळा; व्यवस्थापकीय संचालकांसह अकाउंटंटची उचलबांगडी
By दिनेश पाठक | Published: July 6, 2024 12:30 AM2024-07-06T00:30:59+5:302024-07-06T00:31:39+5:30
केंद्रीय कृषी समितीसह अध्यक्षांकडून अहवाल; एनसीसीएफचे अधिकारी मोकाटच
केंद्र शासन अंगीकृत नाफेडसह एनसीसीएफ संस्थेत कांदा खरेदीत घोटाळा झाल्याची ओरड शेतकऱ्यांकडून सातत्याने होत असल्याने नाफेडचे दिल्लीतील सहायक व्यवस्थापकीय संचालक (ए.एम.डी) सुनीलकुमार सिंग, तसेच नाफेडच्या नाशिक कार्यालयातील अकाउंटंट (लेखापाल) हिमांशू त्रिवेदी यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. सुनीलकुमार यांच्याकडून कांदा विभागाची जबाबदारी काढून घेण्यात आली असून, हिमांशू यांची नाशिकहून मुंबईच्या कार्यालयात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. केंद्रीय कृषी पथक चार दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात असून, त्यांनीच केंद्राला अहवाल देऊन कारवाईचे सूचित केल्याचे वृत्त आहे. नाफेडच्या अध्यक्षांनीही २१ जून रोजी कांदा खरेदी केंद्रांवर धाड मारली होती.
नाफेडच्या दोन अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली असली तरी एनसीसीएफच्या अधिकाऱ्यांना मात्र अजून तरी अभय देण्यात आले आहे. नाशिकसह राज्यभरातील नाफेडसह एनसीसीएफच्या कांदा खरेदी केंद्रांत घोटाळा झाला असल्याचा संशय होता. त्या अनुषंगाने मागील सहा दिवसांपासून केंद्रीय कृषी समिती नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. समितीने अचानक दौरा करत नाफेडच्या दिंडोरीसह अन्य कांदा खरेदी केंद्रावर तपासणी केली होती. त्यात शेतकऱ्यांकडून विक्रीसाठी आलेला कांदा व तेथे एकूण दाखल कांदा यात मोठी तफावत आढळून आली होती, तसेच इतर गैरबाबीही प्रकर्षाने जाणवल्या होत्या. त्या अनुषंगाने समितीने आपला अहवाल केंद्राला पाठविला. त्याचमुळे सुनिलकुमार व हिमांशु त्रिवेदी यांची तातडीने उचलबांगडी करण्यात आली. मात्र यात अजून काही अधिकारी, कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. नाफेड व एनसीसीएफने यंदाही देशभरातून पाच लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय मे महिन्यात घेतला होता. त्यासाठी नाशिक जिल्ह्यात प्रत्येकी १४ ते १५ कांदा खरेदी केंद्रे सुरू केली होती. राज्यातील अहमदनगर, धुळे, नंदुरबार, पुणे, शिरूर, बीड या ठिकाणीदेखील कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते; परंतु देशभरातील खरेदी केंद्रांवर गोळा होणाऱ्या कांद्यांपैकी ८० ते ८५ टक्के कांदा एकट्या नाशिक जिल्ह्यातून खरेदी करण्यात येणार होता. अन् याच खरेदी व्यवहारात गफला होत असल्याची ओरड सातत्याने होत होती.