दीड कोटीच्या ठेक्यासाठी आणखी एका कंपनीचा घोटाळा; बनावट कागदपत्रे बनवली
By नामदेव भोर | Published: April 3, 2023 05:26 PM2023-04-03T17:26:13+5:302023-04-03T17:26:23+5:30
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात फुटले बनावट कागदपत्रांचे पेव
नाशिक : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सव्वा नऊ कोटीच्या ठेक्यासाठी बनावट कागदपत्र दिल्याचा प्रकार शनिवारी (दि. १) उघडकीस आल्यानंतर रविवारी (दि. २) पुन्हा १ कोटी ६० लाख रुपयांच्या ठेक्यासाठी बनावट कागदपत्र देऊन ठेका मिळविल्याच्या प्रकरणात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात बनावट कागदपत्रांच्या आधारे ठेका देण्या-घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात बनावट कागदपत्रांद्वारे टेंडर मिळविण्याचा दोन दिवसांत दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी सॅमसन कंपनीविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर आता तालुका क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांनी रविवारी (दि. २) निर्मल सोल्युशन्स या कंपनीविरोधात तक्रार दिली आहे.
त्यानुसार संशयित निर्मल सोल्युशन्स यांनी १ एप्रिल २०१९ ते १ एप्रिल २०२० या कालावधीत तब्बल १ कोटी ६० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल कला आहे. संशयित निर्मल सोल्युशन्स या कंपनीने ऑनलाइन निविदा प्रक्रियेत बनावट अनुभव प्रमाणपत्र सादर करून बेकायदेशीररीत्या टेंडर मिळवून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व शासनाची १ कोटी ६० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणात सहायक पोलिस निरीक्षक सोनवणे अधिक तपास करीत आहेत.
सॅमसन इंडस्ट्रीजने केली सव्वा नऊ कोटींची फसवणूक
शासकीय मोहर व कामाचा पूर्वानुभव असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर करून सॅमसन इंडस्ट्रीज प्रा. लि. या प्रोप्रायटर कंपनीने जिल्हा क्रीडा कार्यालय व शासनाची ९ कोटी २३ लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणात जिल्हा क्रीडा अधिकारी शनिवारी (दि. १) सुनंदा पाटील यांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात सॅमसन इंडस्ट्रीज कंपनीविरोधात तक्रार दिली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.