आदिवासी विभागातील भरतीत घोटाळा
By admin | Published: February 2, 2016 11:16 PM2016-02-02T23:16:02+5:302016-02-02T23:18:25+5:30
आदिवासी बचाव अभियान : राष्ट्रीय आयोगाकडे केली तक्रार
नाशिक : आदिवासी विकास विभागात नुकत्याच झालेल्या सरळ सेवा भरती प्रक्रियेत सुमारे अडीचशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त करून भरतीप्रक्रिया राबविताना नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचा आरोपही आदिवासी बचाव अभियानने केला आहे. या प्रकरणी अभियानच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर ओरॉन यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
वर्ग एक ते वर्ग चारसाठी ५८४ पदांची सरळ सेवा भरती करण्यात आली होती. या भरतीमध्ये उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन त्यांना नोकरीत सामावून घेण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. प्रत्येक उमेदवारांकडून कमीतकमी ११ लाख रुपये घेण्यात आले असून हा संपूर्ण घोटाळा अडीचशे कोटींचा असावा असाही आरोप करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे भरती करण्याची जबाबदारी ज्या एजन्सीकडे देण्यात आली होती, त्याबाबतच साशंकता असून परीक्षेतच फिक्ंिसग झाली असावी असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.