‘राजसारथी’मधील घरफोडीचा डाव उधळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 11:45 PM2019-06-16T23:45:33+5:302019-06-17T00:06:22+5:30

येथील राजसारथी सोसायटीत रविवारी (दि.१६) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास तिघे चोरटे प्रवेश करून एका बंद घराला लक्ष्य करतात. यावेळी एका रहिवाशाची नजर त्यांच्यावर पडते. रहिवाशाकडून प्रसंगावधान राखत तत्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या ‘टोल-फ्री’ क्रमांकावर संपर्क साधला जातो.

 The scandal broke out in Rajsarathi | ‘राजसारथी’मधील घरफोडीचा डाव उधळला

‘राजसारथी’मधील घरफोडीचा डाव उधळला

Next

इंदिरानगर : येथील राजसारथी सोसायटीत रविवारी (दि.१६) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास तिघे चोरटे प्रवेश करून एका बंद घराला लक्ष्य करतात. यावेळी एका रहिवाशाची नजर त्यांच्यावर पडते. रहिवाशाकडून प्रसंगावधान राखत तत्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या ‘टोल-फ्री’ क्रमांकावर संपर्क साधला जातो.
काही वेळेतच यंत्रणेकडून सतर्कतेचा ‘कॉल’ राजसारथी सोसायटीमधील सर्व रहिवाशांना व जवळच्या पोलीस ठाण्याला मिळतो अन् अवघ्या काही वेळेत घटनास्थळी पोलिसांची मदत पोहोचते. नागरिकांच्या मदतीने पोलिसांकडून घरफोडीचा चोरट्यांचा डाव उधळला जातो. यावेळी ही एक रंगीत तालीम (मॉकड्रिल) असल्याची उद्घोषणा होते आणि सर्व रहिवासी सुटकेचा नि:श्वास सोडतात.
इंदिरानगर परिसरात मागील काही दिवसांपासून सोनसाखळी चोरी, घरफोडी, वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या घटना रोखण्यासाठी नागरिकांची सतर्कता महत्त्वाची असून, प्रसंगावधान राखत नागरी (ग्राम) सुरक्षा यंत्रणेशी (१८००२७०३६००) संपर्क साधल्यास आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ परिसरातील रहिवाशांनाही सावधानतेचा ‘कॉल’ मिळतो आणि जवळच्या पोलीस ठाण्यातदेखील माहिती समजते. इंदिरानगरमधील राजसारथी सोसायटीत राहणारे प्रमोद पिंपळगावकर यांनी नागरी सुरक्षा यंत्रणेला संपर्क साधून तत्काळ परिसरातील घरफोडीची माहिती दिली. यानंतर यंत्रणेकडून सोसायटीतील रहिवाशांना सावधानतेचा इशारा मिळाला तसेच इंदिरानगर पोलिसांना ही घटना समजली. तत्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी हे फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोेचले. यावेळी पोलिसांनी इमारतीत प्रवेश करून चोरट्यास ताब्यात घेतले व त्याच्या साथीदारांनाही सापळा रचून अटक केली. आपत्कालीन स्थितीत मिळणाऱ्या प्रतिसादाबाबत रंगीत तालीम असल्याचे जाहीर करण्यात आल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला. दरम्यान, येथील दत्त मंदिर परिसरात उपआयुक्त अमोल तांबे यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांना ग्राम सुरक्षा यंत्रणेविषयी जागरूक करण्याचा प्रयत्न केला.
काय आहे, नागरी-ग्राम सुरक्षा यंत्रणा
‘सहाय्यम् सर्वतो सहस्त्रश:’ या ब्रीदनुसार ग्राम सुरक्षा यंत्रणा देशभरात सुरू करण्यात आली आहे. ही यंत्रणा देशपातळीवर असून यासाठी जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन मोबाइल क्रमांकाची नोंदणी करणे आवश्यक ठरते. ज्या मोबाइल क्रमांकाची नोंदणी असेल त्याच क्रमांकाला प्रतिसाद दिला जातो. दरोडा, महिलांविषयीचे गुन्हे, लहान मुले बेपत्ता होणे, आगीची घटना, वाहनचोरी, वन्यप्राण्यांचा हल्ला आदी प्रकारच्या आपत्कालीन स्थितीत ग्राम सुरक्षा यंत्रणेकडून प्रतिसाद दिला जातो. नोंदणीसाठी ९५९५००६६५० या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करता येते.

Web Title:  The scandal broke out in Rajsarathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.