घोटाळेबाजांनी संस्कृती शिकवू नये!
By admin | Published: September 26, 2015 10:23 PM2015-09-26T22:23:05+5:302015-09-26T22:25:35+5:30
‘सनातन’चा पलटवार : कत्तल घडवणाऱ्या कॉँग्रेसवरच बंदी आणा
नाशिक : ज्यांनी ‘आदर्श’ शब्दच बदनाम केला, अशा घोटाळेबाजांनी संस्कृतीच्या गप्पा मारू नये, आधी आपल्या पक्षाच्या कृष्णकृत्यांचा आढावा घ्यावा, अशा शब्दांत सनातन संस्थेने कॉँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर आज पलटवार केला. ‘सनातन’वर बंदीची मागणी करणारे चव्हाण, राधाकृष्ण विखे, जितेंद्र आव्हाड हे धर्मद्वेष्टे नेते असून, १९८४ मध्ये केलेल्या ५० हजार शिखांच्या कत्तलीला जबाबदार धरून कॉँग्रेसवरच बंदी आणायला हवी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्या हत्त्येच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपावरून पोलिसांनी समीर गायकवाड या ‘सनातन’च्या साधकाला अटक केली असून, या पार्श्वभूमीवर ‘सनातन’वर बंदी आणण्याची मागणी होत आहे. अशोक चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी अशी जाहीर मागणी केली होती. ‘सनातन’ने पत्रकार परिषद घेऊन त्यांना प्रत्युत्तर दिले व समीर गायकवाड हा निर्दोष असून, लवकरच त्याची मुक्तता होईल, असा दावाही केला.
‘सनातन’चे प्रसारसेवक नंदकुमार जाधव यांनी सदर बंदीची मागणी सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी केली जात असल्याचे सांगत ‘सनातन’चे धर्मजागृतीचे कार्य वाढत चालल्याने अनेकांना पोटशूळ उठून वारंवार आरोप केले जात असल्याची टीका केली. हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय संघटक डॉ. चारुदत्त पिंगळे म्हणाले, समीरचे मोबाइल दुरुस्तीचे दुकान असल्याने त्याच्याकडे २३ मोबाइल आढळून आले. त्यावरून तो दोषी ठरत नाही. या प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन निकालाची वाटही न पाहता ‘सनातन’वर बंदीची मागणी करणे म्हणजे देशाच्या घटनेवर, न्यायव्यवस्थेवर विश्वास नसल्यासारखेच आहे. त्यामुळे अशी मागणी करणाऱ्यांचे लोकप्रतिनिधित्व रद्द करावे. अशा मागण्यांमुळे तपास यंत्रणांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोपही डॉ. पिंगळे यांनी केला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबत कॉँग्रेसने ब्रिटिशांशी तह करून देशाचा विश्वासघात केल्याचेही ते म्हणाले. यावेळी हिंदू जनजागृतीचे समितीचे राज्य संघटक सुनील घनवट उपस्थित होते. (प्रतिनिधी)