बांधकाम नकाशांचे स्कॅनिंग रखडले
By admin | Published: April 23, 2017 02:17 AM2017-04-23T02:17:15+5:302017-04-23T02:17:23+5:30
नाशिक : सदनिकांचे नकाशे व परवानग्या पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय जून २०१६ पासून घेण्यात आला.
नाशिक : शहरातील विविध अपार्टमेंट, सोसायट्या येथे सदनिका-फ्लॅट खरेदी करताना महापालिकेने मंजूर केलेल्या नकाशाप्रमाणेच बांधकाम होते आहे किंवा नाही, याची ग्राहकांना खातरजमा करण्यासाठी संबंधित सदनिकांचे नकाशे व परवानग्या पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय जून २०१६ पासून घेण्यात आला. त्यानुसार, सुमारे साडेसहा हजार मंजूर नकाशांपैकी केवळ २५०० नकाशाचेच संकेतस्थळावर उपलब्ध असून, उर्वरित नकाशे उपलब्ध करून देण्यात नगररचना विभागाने हात आखडता घेतल्याने एकूणच कामकाजाबाबत संशयकल्लोळ वाढला आहे.
मंजूर नकाशाप्रमाणे शहरात बांधकामे केली जात नसल्याची अनेक उदाहरणे ‘कपाट’ प्रकरणातून समोर आलेली आहेत. बांधकाम व्यावसायिकांकडून महापालिकेकडून नकाशा मंजूर करून घेतला जातो; परंतु प्रत्यक्षात नकाशानुसार बांधकाम केले जात नाही. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रकार घडलेले आहेत. महापालिकेने त्यासाठीच ग्राहक जागृती करण्यासाठी विविध अपार्टमेंट, सदनिका, फ्लॅट यांचे नकाशे व परवानग्या पालिकेच्या ँ३३स्र:ुस्र.ल्लेू४३्र’्र३्री२.्रल्ल या संकेस्थळावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय जून २०१६ मध्ये तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी घेतला होता. त्यासाठी स्वत: गेडाम यांनी सोशल मीडियावरून जागृतीपर मोहीमही राबविली होती.
महापालिकेने मंजूर केलेले नकाशे तपासूनच नकाशाप्रमाणे बांधकाम होते आहे किंवा नाही याची खात्री करण्याचे आणि नंतरच सदनिका खरेदी करण्याचे आवाहनही महापालिकेने ग्राहकांना केले होते. मंजूर नकाशांची संख्या खूप असल्याने जसे स्कॅन होतील तसे ते आॅनलाइन उपलब्ध करून दिले जाणार होते. त्यानुसार, संगणक विभागामार्फत दररोज सुमारे दररोज ५० ते १०० नकाशे अपलोड केले जात होते.
त्यानुसार, संगणक विभागाने नगररचना विभागामार्फत जसे उपलब्ध होतील त्याप्रमाणे सुमारे २५०० नकाशे स्कॅन केले, परंतु ही आरंभशूरताच ठरली असली गेल्या सात-आठ महिन्यांपासून नकाशांचे स्कॅनिंगचे काम रखडले आहे. नगररचना विभागामार्फत सदर नकाशेच उपलब्ध करून दिले जात नसल्याने काम रखडल्याचे सांगितले जाते. त्यामुळे नगररचना विभागाच्या एकूणच कार्यपद्धतीबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत.