टंचाई कृती आराखड्याची टॅँकरवरच भिस्त !
By Admin | Published: March 22, 2017 01:24 AM2017-03-22T01:24:55+5:302017-03-22T01:25:08+5:30
नाशिक : उन्हाळ्यात भेडसाविणाऱ्या पाण्याच्या तीव्र टंचाईवर मात करण्यासाठी यंदाही प्रशासनाची सारी भिस्त टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्यावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नाशिक : उन्हाळ्यात भेडसाविणाऱ्या पाण्याच्या तीव्र टंचाईवर मात करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नऊ कोटी रुपये खर्चाच्या टंचाई कृती आराखड्यात पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांतील अनेक कामांपैकी एकही काम सुरू होऊ शकले नसल्यामुळे यंदाही प्रशासनाची सारी भिस्त टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्यावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या टप्प्यात पाण्याच्या टंचाईबाबत व्यक्त करण्यात आलेला अंदाजही फोल ठरल्याने नजीकच्या काळात कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने आॅक्टोबर २०१६ ते जून २०१७ या कालावधीसाठी तयार केलेल्या टंचाई कृती आराखड्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तीन टप्प्यात उपाययोजनांतील नऊ कामे सुचविली असून, सरतेशेवटी टंचाईग्रस्त गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा पर्याय खुला ठेवला आहे. (प्रतिनिधी)
गेल्या वर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे यंदा पाण्याची टंचाई फारशी भासणार नसल्याचा अंदाज अगोदरपासूनच व्यक्त केला जात होता, मात्र तरीही ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ४५८ गावे व ७४८ वाड्यांच्या पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी सव्वा नऊ कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज व्यक्त केला. तथापि, आॅक्टोबर ते डिसेंबर या पहिल्या टप्प्यात अपेक्षित असलेले एकही काम सुरू होऊ शकले नाही.
जानेवारी ते मार्च या दुसऱ्या टप्प्यात २४९ गावे व ३६३ वाड्यांना पाणीटंचाई भेडसाविण्याची शक्यता व्यक्त करून प्रगतीतील नळ पाणीपुरवठा योजना, विंधन विहिरी, नळ दुरुस्ती योजना, तात्पुरती पूरक नळ योजना, विशेष दुरुस्ती, विहिरी खोल करणे, बुडक्या घेणे, खासगी विहिरी अधिग्रहित करणे यांसारखी कामे कृती आराखड्यात समाविष्ट केली. मात्र यापैकी एकही काम या तीन महिन्यांत सुरू होऊ शकलेले नाही किंबहुना पाणीपुरवठा विभागाने त्याबाबतचा प्रस्तावही सादर केला नाही. उलटपक्षी बागलाण व मालेगाव तालुक्याला तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने प्रशासनाला पाच टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा लागला. ज्या गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो, तेथे एकही उपाययोजना केली नाही.
मार्चअखेर उन्हाचा वाढलेला तडाखा पाहता, एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत पिण्यासाठी तसेच जनावरांसाठी पाण्याची मागणी आणखी वाढणार असली तरी, सद्यस्थितीत टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यावरच भर दिला जाण्याची चिन्हे आहेत.