वीजमीटरचा तुटवडा; म्हणे नादुरुस्त मीटर बदला मुख्य अभियंताही अनभिज्ञ : व्यवस्थापकीय संचालक म्हणतात, राज्यात मीटर पुरेसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 01:02 AM2018-04-07T01:02:59+5:302018-04-07T01:02:59+5:30
नाशिक : वीजहानी कमी करण्याबरोबरच महसुलात वाढ करण्यासाठी नादुरुस्त वीजमीटर बदलण्याचे आदेश खुद्द महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिले आहेत.
नाशिक : वीजहानी कमी करण्याबरोबरच महसुलात वाढ करण्यासाठी नादुरुस्त वीजमीटर बदलण्याचे आदेश खुद्द महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिले असले, तरी शहरात वीजमीटर शिल्लकच नसल्याने अनेक उपकार्यालयांमध्ये नवीन वीजमीटरचे अर्ज महिनाभरापासून पडून आहेत. याबाबतची माहिती मुख्य अभियंत्यांनादेखील नसल्यामुळे त्यांनीही नवीन वीजमीटर देण्याचे आदेश आपल्या अभियंत्यांना दिले आहेत. येत्या तीन महिन्यांत घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा वीजवापर वाढणार असल्याने येत्या महिनाभराच्या आत ग्राहकांचे नादुरुस्त वीजमीटर बदलावेत अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिले आहेत. महावितरणच्या मुख्य अभियंत्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधताना त्यांनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत. एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांमध्ये ग्राहकांच्या वीजवापरात वाढ होते. या काळात अचूक बिलिंग करून वसुली वाढविण्यासाठीचे अचूक काम केल्यास महावितरणची आर्थिक घडी सुरळीत राहण्यास मदत होणार असल्याचे संजीवकुमार यांचे म्हणणे आहे. सध्या राज्यभर पुरेशा प्रमाणात मीटर उपलब्ध आहेत. यापुढे ग्राहकांना गरजेनुसार मीटर उपलब्ध करून देण्यात येतील असे व्यवस्थापकीय संचालकांनी म्हटले असले, तरी प्रत्यक्षात शहरात वीजमीटर शिल्लकच नसल्याने शहरातील अनेक कक्ष कार्यालयांमध्ये वीजमीटरसाठी ग्राहकांना रोज चकरा माराव्या लागत आहेत. वीजमीटरची नोंदणी करण्यात आली असून, महिनाभरात वीजमीटर येतील तेव्हा मागणी यादीनुसार वीजमीटर लावले जातील अशी उत्तरे कनिष्ठ अभियंते देत असताना, मुख्य अभियंत्यांना शहरातील वीजमीटर्सची माहिती नसल्याचा अर्थ त्यातून काढला जात आहे. शहरातील इंदिरानगर कक्ष कार्यालयाकडे वीजमीटर नसल्यामुळे तर ग्राहकांना रोजच चकरा माराव्या लागत आहेत. यातून कनिष्ठ अभियंता आणि ग्राहकांमध्ये अनेकदा वादाचेही प्रसंग उद्भवतात. असे असतानाही मुख्य अभियंत्यांनी मात्र कनिष्ठ अभियंत्यांच्या अडचणी समजून न घेता वीजमीटर देण्याचे आदेश आपल्या अभियंत्यांना दिल्याने कनिष्ठ अभियंत्यांपुढेच प्रश्न उभा राहिला आहे.