टंचाई निवारणाची कामे कागदावरच

By admin | Published: February 17, 2016 11:56 PM2016-02-17T23:56:31+5:302016-02-17T23:59:13+5:30

कामांना मंजुरीची प्रतीक्षा : प्रशासनाचे आस्ते कदम

Scarcity prevention works on paper | टंचाई निवारणाची कामे कागदावरच

टंचाई निवारणाची कामे कागदावरच

Next

नाशिक : उन्हाळ्यात भेडसाविणाऱ्या भीषण पाणीटंचाईचा वेळेतच मुकाबला करून त्यावर उपाययोजना करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टंचाई कृती आराखड्यातील दुसऱ्या टप्प्यातील कामे अद्यापही कागदावरच असून, जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा परिषद अशा दोन कार्यालयांमध्येच कामांचे प्रस्ताव फिरत असल्याने यंदाही टंचाईग्रस्त गावांची तहान फक्त टॅँकरद्वारेच भागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आॅक्टोबरमध्येच टंचाई कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचे शासनाचे स्थायी आदेश आहेत, परंतु प्रशासनातील अधिकाऱ्यांना ‘तहान लागल्यावर विहीर खणण्याची’ सवय असल्यामुळे यंदाही डिसेंबर महिन्यात जिल्हा परिषदेने टंचाई कृती आराखडा तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. दरम्यान, आॅक्टोबर ते डिसेंबर हा टंचाई आराखड्यातील पहिल्या टप्प्यात एकही काम जिल्ह्यात टंचाई निवारणाचे होऊ शकले नाही, त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात (जानेवारी ते मार्च) भेडसाविणाऱ्या संभाव्य टंचाईचा मुकाबला करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सुमारे अकरा कोटी रुपये खर्चाच्या कामांचे प्रस्ताव वेळेत सादर होऊन त्यांना तत्काळ मंजुरी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात असतानाच, प्रत्यक्षात त्याबाबतही प्रशासनाची वाटचाल संथगतीने सुरू आहे.
जानेवारी ते मार्च या कालावधीत अकरा कोटी रुपयांच्या कामांमध्ये विंधन विहिरी, नळ पाणी योजना दुरुस्ती व तात्पुरत्या नळ पाणी योजना अशी कामे सुचविण्यात येऊन जिल्हा परिषदेने नळ दुरुस्तीचे ३१ प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले, परंतु ज्या गावांमध्ये योजना राबविण्यात येणार, त्या गावांमधील टंचाईच्या परिस्थितीचे पुन्हा अवलोकन करण्याची सूचना करून जिल्हाधिकाऱ्यांनी सदरचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे परत पाठविले.
प्रस्तावांच्या या प्रवासात निम्मा फेब्रुवारी महिना उलटून गेला असून, अजूनही जिल्हा परिषदेने ३१ प्रस्तावांपैकी निम्मेच फेरप्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले आहेत. हे प्रस्तावही मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्यामुळे कामे सुरू होण्यास मार्च उजाडण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Scarcity prevention works on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.