चिंचखेड येथे बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 06:58 PM2018-11-20T18:58:35+5:302018-11-20T18:59:21+5:30
वणी : दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास चिंचखेड येथील दोन नंबर चारी येथे राहणारे योगेश जगताप यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले आहे.

मंगळवारी योगेश जगताप यांच्या शेतात मका काढण्यासाठी काही महिला मजूर काम करत होत्या.
दुपारी चार वाजेच्या सुमारास मक्याच्या शेतात बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करून त्याचे पोट पूर्णपणे फाडून खाल्ले. हा सर्व प्रकार महिला मजुरांनी बघितल्यानंतर त्यांनी भीतीने आरडाओरडा सुरू केली. त्यानंतर कुत्र्याला शेतामध्ये टाकून बिबट्याने तेथून पळ काढला.
दरम्यान या सर्व घटनेमुळे शेतकरी तसेच मजुरांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्याला त्वरीत पकडण्यासाठी वनविभागाने योग्य त्या उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात येत आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी देखील बिबट्याने येथील तीन शेळ्या तसेच एका वासरावर हल्ला करून ठार त्यांना केले होते. त्यामुळे वनविभागाने बिबट्या पकडण्यासाठी लवकरात लवकर योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी परिसरातून केली जात आहे.