अवर्षणग्रस्त सिन्नर तालुक्यात चंदन शेतीचा सुगंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:20 AM2018-01-25T00:20:51+5:302018-01-25T00:21:32+5:30
अवर्षणग्रस्त म्हणून ओळखल्या जाणार्या सिन्नर तालुक्याच्या पूर्वभागातील शेतकर्यानी चाकोरीबाहेर जाऊन प्रयोग करण्याचे धाडस दाखविले आहे. पारंपरिक पिकांवर उपजीविका सुरू ठेवण्यासोबतच जोड शेती म्हणून चंदनशेतीचा पर्याय शेतकर्यानी निवडला आहे. कृषिधन, फळभाजीपाला व सुगंधी वनस्पती उत्पादक सहकारी सोसायटीच्या पुढाकारातून तालुक्यात सुमारे ५० एकरावर चंदनशेती बहरली आहे.
शैलेश कर्पे
अवर्षणग्रस्त म्हणून ओळखल्या जाणार्या सिन्नर तालुक्याच्या पूर्वभागातील शेतकर्यानी चाकोरीबाहेर जाऊन प्रयोग करण्याचे धाडस दाखविले आहे. पारंपरिक पिकांवर उपजीविका सुरू ठेवण्यासोबतच जोड शेती म्हणून चंदनशेतीचा पर्याय शेतकर्यानी निवडला आहे. कृषिधन, फळभाजीपाला व सुगंधी वनस्पती उत्पादक सहकारी सोसायटीच्या पुढाकारातून तालुक्यात सुमारे ५० एकरावर चंदनशेती बहरली आहे. सिन्नर तालुक्यात सातत्याने दुष्काळी परिस्थिती राहिल्याने शेतकºयांसाठी शेती आतबट्ट्याची ठरत आहे. त्यामुळे काहीतरी वेगळे केले पाहिजे या भावनेतून सुमारे पावणेदोन वर्षांपूर्वी उजनी येथील युवा शेतकरी राम मोहन सुरसे यांनी चंदनशेती करण्याचा धाडसी निर्णय घेतला. कन्हैयालाल भुतडा, विजय शिंदे, बाळासाहेब कासार या शेतकर्यासोबत सुरसे यांनी कर्नाटक, तामिळनाडू येथे जाऊन चंदनाची शेती व चंदनावर आधारित प्रक्रिया उद्योगांची माहिती घेतली. सुमारे दोन आठवड्यांचा अभ्यास दौरा केला. या दौर्यात सुरसे यांच्यासह शेतकर्यानी चंदनावर काम करणारे बेंगळुरू येथील इन्स्टिट्यूट आॅफ वूड सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरमधील संशोधक डॉ. श्याम विश्वनाथ यांच्यासोबत चर्चा करून चंदनाच्या शेतीची माहिती घेतली. त्यानंतर फॉरेस्ट कॉलेज अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, तामिळनाडू येथे भेट देत प्रत्यक्ष शेती करणाºया शेतकर्यासोबत संवाद साधून चंदनशेतीचे तंत्र जाणून घेतले. त्यानंतर सुरसे यांच्यासह शेतकर्यानी एकत्र येऊन सिन्नर तालुक्यात चंदनशेती करण्याचा निर्णय घेतला. कृषिधन फळभाजीपाला व सुगंधी वनस्पती सहकारी संस्थेची स्थापना केली. सुमारे दीड वर्षांपूर्वी सिन्नर तालुक्यात सुमारे २५ एकरावर चंदनाची लागवड करण्यात आली. आज तालुक्यातील सुमारे १५ शेतकर्यानी ५० एकरावर चंदनशेती फुलवली आहे. शासनाने या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदानही देऊ केले आहे.
राम सुरसे या युवा शेतकºयाने सुमारे तीन एकरावर एक हजार चंदनाच्या झाडांची लागवड केली आहे. सुमारे दीड वर्षापूर्वी लागवड केलेली झाडे पाहण्यासाठी आत्तापर्यंत सुमारे ५००हून अधिक शेतकºयांनी सुरसे यांच्या शेतीला भेट दिली आहे. चंदन हे परावलंबी आहे म्हणून ते जमिनीतून नायट्रोजन आणि फॉस्फरस घेऊ शकत नाही. परंतु ते शेजारच्या झाडांचे मुळापासून नायट्रोजन आणि फॉस्फरस
घेते. त्यामुळे सुरसे यांनी त्यांच्या शेतात चंदनाच्या लागवडीसोबतच एक हजार यजमान (होस्ट ट्री) म्हणून मिलचाहुबा हे झाड लावले आहे.
आता त्यांच्या चंदनशेतीने चांगलेच बाळसे धरले आहे. बारा वर्षांनंतर चंदनाच्या शेतीचे उत्पन्न मिळण्यास प्रारंभ होतो. सुमारे ६ ते ७ वर्ष ठिबकद्वारे झाडांना पाणी द्यावे लागते. त्यानंतर पाणी देण्याची गरज भासत नाही. ७ वर्षांनंतर झाडांच्या संरक्षणाची गरज भासते.
राष्टÑीय आयुष अभियानांतर्गत औषधी वनस्पती घटकांमध्ये चंदनाचा समावेश करण्यात आला आहे. राज्यात महाराष्टÑ फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ कार्यालयामार्फत समूह पद्धतीने राबविण्यात येत आहे. या अंतर्गत औषधी वनस्पती लागवड साहित्यनिर्मिती, औषधी वनस्पती लागवड, काढणीत्तोर व्यवस्थापन, प्रक्रिया व मूल्यवर्धन यासाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे. चंदनशेतीला शासनाकडून अनुदान दिले जाते.