योजना : चांदवड तालुक्यातील २२ गावांचा समावेश
By admin | Published: January 22, 2015 12:26 AM2015-01-22T00:26:59+5:302015-01-22T00:27:12+5:30
जलयुक्त शिवार अभियानास प्रारंभ
दरेगाव : चांदवड तालुका दुष्काळी तालुका असून, येथील अनेक गावे ५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असणारी आहेत. राज्य शासनाने राज्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानास सुरुवात केली आहे. लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून जलसंधारणाची एकात्मिक योजना राबविण्यात येत आहे.
राज्य शासनाने प्राधान्याने हा कार्यक्रम हाती घेतला आहे. यामुळे तलाव, सीमेंट, नालाबंधारे, माती नाला बंधारे यातील वर्षानुवर्षे साठलेला गाळ काढणे शक्य होणार आहे. पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकटीकरण करणे, दुरुस्ती करणे, जलफेरभरण व गाळ काढणे, खोल सलग समतल चर या बाबींवर जलयुक्त शिवार अभियानात ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असणाऱ्या गावात प्राधान्याने उपाययोजना करण्यात येणार आहे.
पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार करण्यात आले आहे. त्यात पहिल्या टप्प्यात मेसनखेडे खुर्द, कानडगाव, नारायणखेडे, कातरवाडी, वडगावपंगू या गावांचा समावेश आहे.
तसेच त्यानंतर दरेगाव, डोणगाव, रायपूर, वाद, वराडी, कुंदलगाव, दहेगाव, भडाणे, निंबाळे, आडगाव, आसरखेडे, पाटे, गोहरण, मेसनखेडे बुद्र्रूक, हट्टी या गावांचा समावेश करण्यात आला आहे. (वार्ताहर)