सर्व्हर नसल्याने स्कॉलरशिप अर्ज रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:15 AM2021-04-01T04:15:25+5:302021-04-01T04:15:25+5:30
नाशिक : सामाजिक न्याय विभागाचे सर्व्हर डाऊन असल्याने शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याच्या अखेरच्या दिवशीही विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली नसल्याने ...
नाशिक : सामाजिक न्याय विभागाचे सर्व्हर डाऊन असल्याने शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याच्या अखेरच्या दिवशीही विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली नसल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी अडचणीत आले आहेत. सर्व प्रक्रिया ऑनलाइन असल्याने नाशिकच्या सामाजिक न्याय विभागालादेखील याबाबतची कोणतीही माहिती नसल्याने गोंधळात अधिकच भर पडली.
सन २०२१ वर्षासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. परंतु तांत्रिक अडचणी असल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून रोज विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना अर्ज पूर्ण होण्याची वाट बघावी लागत आहे. सर्व्हर काम करीत नसल्यामुळे असंख्य विद्यार्थी शिष्यवृत्ती अर्ज भरण्यापासून वंचित राहिले आहेत.
यंदा लांबलेली प्रवेशप्रक्रिया आणि त्यामुळे प्रवेश घेण्यासाठी विलंब झाला असल्याने पुढील सर्व प्रक्रियाच विलंबाने सुरू झाली आहे. सामाजिक न्याय विभागाने मागील महिन्यापासून प्रक्रिया सुरू केली असली तरी तोपर्यंत प्रवेश पूर्ण झालेले नसल्याने महाविद्यालयांनीदेखील प्रवेशाच्या काही दिवसांनंतर विद्यार्थ्यांना याबाबतची माहिती दिली. त्यामुळे शिष्यवृत्ती अर्ज दाखल करण्यास उशिरा प्रारंभ झाला. त्यातच अनेकदा सर्व्हर डाऊनचा अडसर आला. अनेक विद्यार्थी गेल्या पाच दिवसांपासून प्रयत्न करूनही त्यांचा अर्ज दाखल होऊ शकलेले नाहीत.
३१ मार्च अखेरची तारीख असल्याने आणि सर्व्हर अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नसल्याने असंख्य विद्यार्थी शिष्यवृत्ती अर्जापासून वंचित आहेत. सर्व्हरची तांत्रिक अडचण लक्षात घेता सामाजिक न्याय विभागाने अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून केली जात आहे.