महाविद्यालयांमध्ये अडकले ३७ हजार विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:14 AM2021-03-28T04:14:12+5:302021-03-28T04:14:12+5:30
केंद्र शासनाच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्ग ...
केंद्र शासनाच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्ग प्रवर्ग इत्यादी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अकरावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. त्यानुषंगाने शिष्यवृत्ती योजनेंतर्गत २०२०-२१ या वर्षातील शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज ३१ मार्चपर्यंत ऑनलाइन पध्दतीने समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक आहे. परंतु मार्चअखेर जवळ आलेला असताना, जिल्ह्यातील ३२१ महाविद्यालयांकडून ३७ हजार १०९ विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज अद्याप समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आलेले नाहीत. शिष्यवृत्तीचे अर्ज महाविद्यालयांमध्ये प्रलंबित असल्याने, संबंधित विद्यार्थ्यांना चालू आर्थिक वर्षातील शिष्यवृत्ती मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रलंबित अर्ज २५ मार्चपर्यंत सादर करा; महाविद्यालयांना निर्देश
समाजकल्याण विभागाच्या नाशिक कार्यालयातर्फे जिल्ह्यातील महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्ज भरलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांशी संपर्क साधून संबंधित प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचनाही कार्यालयाकडून संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांना करण्यात आल्या आहेत.
प्रवर्गनिहाय प्रलंबित अर्जांची संख्या
जिल्ह्यातील एकूण महाविद्यालये- ३२१
महाविद्यालयांत एकूण प्रलंबित अर्ज- ३७१०९
अनुसूचित जाती प्रवर्ग -७५६५
इतर मागास प्रवर्ग(ओबीसी), विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग -२९५४४