उद्यापासून गजबजणार शाळा! पुन:श्च हरिओम : नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 06:41 PM2021-01-02T18:41:19+5:302021-01-03T00:49:25+5:30
जळगाव नेऊर : कोरोनाने निम्म्याहून अधिक शैक्षणिक वर्ष वाया गेल्यानंतर, आता कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी होत असताना, जिल्ह्यात सोमवार (दि.४)पासून पुन्हा एकदा शाळांच्या घंटा वाजणार आहे. जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, कोरोनाच्या नियमांचे पालन करत नववी ते बारावीचे वर्ग भरणार असून, त्याची पूर्वतयारी शाळा-महाविद्यालयात सुरू आहे.
जळगाव नेऊर : कोरोनाने निम्म्याहून अधिक शैक्षणिक वर्ष वाया गेल्यानंतर, आता कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी होत असताना, जिल्ह्यात सोमवार (दि.४)पासून पुन्हा एकदा शाळांच्या घंटा वाजणार आहे. जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, कोरोनाच्या नियमांचे पालन करत नववी ते बारावीचे वर्ग भरणार असून, त्याची पूर्वतयारी शाळा-महाविद्यालयात सुरू आहे.
कोरोनामुळे शाळा-महाविद्यालयांना टाळे लागले होते. त्यातही ऑनलाइन शिक्षणातून ज्ञानगंगा वाहती ठेवण्यात आली, परंतु ऑनलाइन शिक्षणात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, पुन्हा एकदा शाळांच्या घंटा वाजण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू होते. राज्य शासनाने यापूर्वीच नववी ते बारावीचे शालेय सत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या शक्यतेने पुन्हा एकदा सत्र लांबणीवर पडले होते. नाशिक जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सकारात्मक भूमिका घेत, ४ जानेवारी, २०२१ पासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग भरविण्याला मान्यता दिली. त्यानुसार, येत्या सोमवारपासून शाळा पुन्हा विद्यार्थी व शिक्षकांनी गजबजणार आहेत. शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह असला, तरी कोरोना संसर्ग अद्यापही कायम असल्याने शासकीय नियमांचे पालन करून या शाळा सुरू होत आहे. त्या अनुषंगाने शिक्षण विभागाने मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, संस्थाचालकांना मार्गदर्शक सूचना पत्राद्वारे पाठविल्या आहेत. यात विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता जपण्यास प्राधान्य दिले आहे. राज्य शासनाने कोविड १९ नियमावलींचे पालन करणे अनिवार्य केले आहे.
एका बेंचवर एकच विद्यार्थी
जिल्हा स्तराहून शाळांसाठी मार्गदर्शक सूचना नियमावली पाठविण्यात आली असून, यामध्ये शाळांची नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरण, बाधित असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच शाळेत प्रवेश, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आर टीपीसीआर तपासणी, शिक्षक व विद्यार्थी यांची दररोज थर्मल स्क्रिनींगद्वारे तपासणी, शाळेत आपत्कालीन गट, स्वच्छता गट स्थापन करणे असे नियम ठरवून देण्यात आले आहेत. तसेच विद्यार्थ्यांना दिवसाआड शाळेत प्रवेश मिळणार आहे. शाळेत ५० टक्के, तर घरी ऑनलाईन शिक्षणासाठी ५० टक्के उपस्थिती राहणार आहे. वर्गात एका बेंचवर एकच विद्यार्थी बसेल. नववी ते बारावीपर्यंत ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षण मिळणार आहे. विद्यार्थ्यांची ने-आण करताना पालकांना सोबत यावे लागणार आहे.
शाळेचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गखोल्या सॅनिटाईझ केल्या आहेत. पुन्हा येत्या आठवड्यात वर्गखोल्या सॅनिटाईझ केले जातील, शिक्षण विभागाचे सर्व नियम पाळून विद्यार्थ्यांची काळजी घेण्यात येणार आहे.
- एन.आर.दाभाडे,प्राचार्य, जळगाव नेऊर विद्यालय.
गेली नऊ महिन्यापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जात जाण्याची भीती निर्माण झाली होती पण शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून शाळा सुरू होत असल्याने आनंद झाला असून विद्यार्थ्यांचे नुकसान टळणार आहे.
- शरद तिपायले, पालक, जळगाव नेऊर.