शाळेची घंटा आॅगस्टमध्येच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 12:31 AM2020-06-15T00:31:26+5:302020-06-15T00:32:44+5:30
लॉकडाऊननंतर शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण खात्याने वेगवेगळ्या तारखा घोषित केल्या. १५ जून रोजी शाळेची घंटा वाजणार असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र, पालक आणि शिक्षण संस्थांचा विरोध तर वाढलाच शिवाय केंद्र शासनानेदेखील आॅगस्टचा मुहूर्त दिल्याने आता १५ जून रोजी शाळेची घंटा वाजणारच नसल्याचे दिसते आहे.
नाशिक : लॉकडाऊननंतर शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण खात्याने वेगवेगळ्या तारखा घोषित केल्या. १५ जून रोजी शाळेची घंटा वाजणार असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र, पालक आणि शिक्षण संस्थांचा विरोध तर वाढलाच शिवाय केंद्र शासनानेदेखील आॅगस्टचा मुहूर्त दिल्याने आता १५ जून रोजी शाळेची घंटा वाजणारच नसल्याचे दिसते आहे. दरम्यान, शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी आपण केवळ माहिती संकलित करण्यासाठी शाळांना पत्र पाठविले असल्याचा दावा केला आहे. तथापि, त्यांच्याकेवळ पत्रामुळे शिक्षक-शिक्षकेतर संघटनांना निवेदने देण्यापासून आंदोलनाच्या पवित्रा घेण्यापर्यंत सारे काही नाहक करावे लागले.
लॉकडाऊन काळात शाळा आणि महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यानंतर आता शासनानेच सारे काही टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात उद्योग आणि बाजारपेठा सुरू झाल्या असल्या तरी शाळा महाविद्यालये सुरू करावीत काय आणि ती कधी करावीत याविषयी शिक्षण क्षेत्रात संभ्रम आहे. त्यातच शिक्षण विभागातील राज्य स्तरावरून स्थानिक स्तरापर्यंत अधिकारी वेगवेगळे पत्र पाठवित आहेत. त्यामुळे शिक्षण खात्याची नक्की भूमिका काय? असा संभ्रम निर्माण झाला आहेत.
दरम्यान, आता शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रवीण पाटील यांच्याशी संपर्क साधला असता आपल्या पत्राचा वेगळ अर्थ काढण्यात आला. वस्तूत: ९ जूनपर्यंत शासनाला काही माहिती पाठविणे आवश्यक होते. त्यादृष्टीने हे पत्र पाठविण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे शाळा १५ जून रोजी होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. परंतु, यासंदर्भात शाळा व्यवस्थापन अथवा मुख्याध्यापक यांना अधिकृत माहिती मिळाली नसल्याने अजूनही संभ्रम कायम असल्याचे शिक्षकांनी सांगितले.