आज वाजणार शाळेची घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 01:29 AM2021-01-04T01:29:53+5:302021-01-04T01:30:12+5:30
शहरासह जिल्हाभरातील शाळा सोमवारपासून (दि.४) सुरू होणार असून, तब्बल नऊ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर शाळेची घंटा वाजणार आहे. पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीच्या शाळा सुरू होणार आहे.
नाशिक : शहरासह जिल्हाभरातील शाळा सोमवारपासून (दि.४) सुरू होणार असून, तब्बल नऊ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर शाळेची घंटा वाजणार आहे. पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीच्या शाळा सुरू होणार आहे.
शहर व जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली असून, गेल्या नऊ महिन्यांपासून ओस पडलेल्या साळा पुन्हा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून जाणार आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळांमध्ये सॅनिटायझर फवारणीसह जोरदार स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. शाळा सुरू करण्यापूर्वी प्रत्येक शाळेतील आवश्यकतेनुसार विज्ञान, इंग्रजी व गणित विषयांच्या शिक्षकांसह शिपाई, कारकून आणि मुख्याध्यापक अशा सहा कर्मचाऱ्यांची तपासणी करण्याच्या सूचना शासनाकडून करण्यात आल्या होत्या.
खासगी शाळा संघटनेवर कारवाईची मागणी
n नाशिक शहरातील काही शाळांच्या संस्था चालकांनी खासगी शाळा संघटनेची स्थापना करून शिक्षण उपसंचालकांकडे निवेदनाद्वारे शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार, आता सोमवारपासून शाळा सुरू होत असताना, काही शाळांनी शुल्कवसुलीसाठी ऑनलाइन शिक्षण बंद करण्याची भूमिका घेतली आहे. काही शाळांनी सर्वच विषयांचे वेळापत्रक तयार करून विद्यार्थ्यांना शाळेत येण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
सर्व विषयांचे वेळापत्रक
n शासनाने सोमवारपासून शाळा सुरू करताना, केवळ तीन तासिकांचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या असून, उर्वरित विषयांचा अभ्यासक्रम ऑनलाइनद्वारेच शिकविण्याच्या सूचना केल्या आहेत.
n नाशिक शहरातील काही खासगी शाळांनी संपूर्ण विषयांचे वेळापत्रक जाहीर करून ऑनलाइन शिक्षण बंद करण्याची तयारी सुरू केली आहे.
n अशा प्रकारे ऑनलाइन शिक्षण बंद करून शाळांकडून सक्तीने शुल्कवसुलीचा घाट घातला जात असल्याचा आरोप पालक संघटनाच्या प्रतिनिधींना केला
आहे.