मुलांच्या स्वागतासाठी सजल्या शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 11:48 PM2019-06-16T23:48:30+5:302019-06-17T00:06:39+5:30
नाशिक : शिक्षण विभागातर्फे सोमवारी (दि. १७) शाळा प्रवेश दिंडीचे आयोजन करण्याच्या सूचना करण्यात आल्या असून, शाळा व्यावस्थापन समिती ...
नाशिक : शिक्षण विभागातर्फे सोमवारी (दि. १७) शाळा प्रवेश दिंडीचे आयोजन करण्याच्या सूचना करण्यात आल्या असून, शाळा व्यावस्थापन समिती सदस्य बैठक, पालक शिक्षक समिती बैठक, नवागतांचे स्वागत, मोफत पाठ्यपुस्तके व मोफत गणवेश खरेदी केल्याबाबतचा आढावा घेतला जाणार आहे. त्याचप्रमाणे १७ ते २५ जून या कालावधीत शाळा प्रवेशाकरिता पटनोंदणी शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. तर २६ जूनला शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या भेटीचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी २६ ते २९ जून दरम्यान महापालिका क्षेत्रातील शालेय परिसरात गृहभेटीचे नियोजन करून १ जुलैला शिक्षण विभागाला माहिती सादर करण्याच्या सूचना शाळांना करण्यात आल्या आहेत.
नाशिक : महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे ६ ते १४ वयोगटातील सर्वच मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी १७ ते ३० जून या कालावधीत पटनोंदणी पंधरवडा व शाळा प्रवेशोत्सव राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात महापालिका क्षेत्रातील सर्व केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांना सूचना करण्यात आल्याची माहिती शिक्षण अधिकारी देवीदास महाजन यांनी दिली आहे.
शिक्षण विभागातर्फे २०१९-२० पासून महत्त्वाकांक्षी समग्र शिक्षा अभियान राबविण्यात येत असून, या अभियानांतर्गत १७ ते ३० जून या कालावधीत मनपा क्षेत्रातील ४ ते १४ वयोगटातील सर्वच मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. या अभियानात १४ जून रोजी मुख्याध्यापक व केंद्र प्रमुखांची कार्यशाळा झाली असून १५ जूनला केंद्र स्तरावर सर्व खातेप्रमुख व अधिकारी यांना शाळा वाटप करून संपर्क अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
त्याचप्रमाणे मनपास्तरावर संपर्क अधिकाऱ्यांच्या अभियानादरम्यान शाळांना भेटीचे नियोजन, स्थानिक माध्यमांतून माहिती प्रसारण, शाळा व्यवस्थापन समित्यांच्या सभांचे आयोजन करून १५ ते १७ जून या कालावधीत शालेय परिसरात दवंडी देण्याचे नियोजन करण्यात आले असून १६ जूनला शालेय परिसरात शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, अंगणवाडी सेविका व मदतनीस सर्व शिक्षक, मुख्याध्यापक यांनी पटनोंदणीसाठी फेरीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाजन यांनी दिली.