१९ तारखेला शाळा सुरू की बंद?

By admin | Published: August 5, 2015 12:08 AM2015-08-05T00:08:39+5:302015-08-05T00:09:06+5:30

पोलिसांचा आततायीपणा : संस्थाचालक संभ्रमात, तर विद्यार्थी-पालकांना धास्ती

The school is closed on 19th? | १९ तारखेला शाळा सुरू की बंद?

१९ तारखेला शाळा सुरू की बंद?

Next

नाशिक : कुंभमेळ्याला प्रत्यक्ष सुरुवात होण्याआधीच पोलिसांनी ठिकठिकाणी नाके बंदी करण्यास सुरुवात केली असून, पोलिसांच्या या काराभारामुळे तपोवनात १९ आॅगस्टला ध्वजारोहण असले तरी संपूर्ण शहरात रस्ते कुठे बंद असणार, नोकरी व्यवसायानिमित्त कामावर जाता येईल किंवा नाही अशा चर्चा सुरू आहेत. त्यातच विद्यार्थी आणि पालकांना याविषयी अधिक धास्ती असून, संस्थाचालक संभ्रमात आहेत, परंतु शिक्षण खात्याने याबाबत कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही.
बारा वर्षांनी कुंभमेळा भरत असला तरी ठराविक दिवशीच रामकुंड परिसरात गर्दी होते. आजवर पुरोहित संघ किंवा आखाड्यांच्या वतीने साधुग्राममध्ये केल्या जाणाऱ्या ध्वजारोहणासाठी लाखोंच्या संख्येने कधीही गर्दी होत नाही, हे वास्तव असताना पोलिसांकडून ध्वजारोहण सोहळा जणू पर्वणीची रंगीत तालीम असल्यागत निर्बंध घालण्यात येत आहेत. पुरोहित संघाच्या ध्वजारोहण्याच्या वेळी पोलिसांनी रामकुंडाकडे येणाऱ्या रस्त्यांवर निर्बंध जाहीर केले होते प्रत्यक्षात अनेक ठिकाणांहून पोलीस वाहनचालकांना अडवीत होते. त्यामुळे आखाड्यांचे ध्वजारोहण हा त्या त्या साधू-महंतांपुरता मर्यादित विषय असताना पंचवटी, रामकुंड, साधुग्राम अशा सर्वच परिसरात वाहतूक मार्गात बदल केले आहेत, परंतु तरीही शहराच्या अन्य भागात पोलीस अशाच प्रकारे आततायीपणा दाखवतील अशी विद्यार्थी, पालक आणि शाळांना धास्ती वाटत असून, अनेक शाळा धोका न पत्करता सरळ १९ तारखेला शाळा बंद ठेवण्याच्या मनस्थितीत आहेत. पोलीस, जिल्हा प्रशासन अथवा शिक्षण खात्याने तसा निर्णय घेतला नसला तरी रस्ते बंदच्या धास्तीने पालकही विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याच्या तयारीत नाहीत. त्यामुळे अघोषित सुटी मिळण्याची शक्यताच अधिक आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी महापािलका शिक्षण मंडळाला शाळांच्या वेळा बदलण्याचे वा सुटीचे अधिकार दिले आहेत. मात्र, परिस्थिती बघून निर्णय घेऊ, असे शिक्षण मंडळाचे प्रशासक दत्तात्रेय गोतिसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The school is closed on 19th?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.