वादग्रस्त शिक्षकाच्या बदलीसाठी शाळा बंद
By admin | Published: October 20, 2016 12:27 AM2016-10-20T00:27:47+5:302016-10-20T00:31:38+5:30
टाळे ठोक आंदोलन : तीन दिवसांपासून नामपूर येथील विद्यार्थ्यांची हेळसांड
सटाणा : विद्यार्थ्यांना मारहाण करणे, शिक्षक व पालकांशी अरेरावी करणे यामुळे वादग्रस्त ठरलेल्या शिक्षकाची प्रशासनाने पुन्हा त्याच शाळेत बदली केल्याने संतप्त झालेल्या नामपूर येथील सरपंच सोनाली निकम यांच्यासह शालेय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्राथमिक शाळेला टाळे ठोकून तीन दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत त्या शिक्षकाची अन्यत्र बदली केली जात नाही तोपर्यंत टाळे बंद आंदोलन सुरूच राहील, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने आज बुधवारी तिसऱ्या दिवशीही शिक्षकांनी झाडाखाली वर्ग भरविले. त्यामुळे विद्यार्थ्यांची हेळसांड झाली.
जिल्हा परिषदेचे शिक्षक पंडित शंकर कापडणीस हे विद्यार्थ्यांना मारहाण करतात, शिक्षक व पालकांशी अरेरावी करतात या आरोपांमुळे अंबासन, इंदिरानगर, नामपूर येथील ग्रामस्थांनी शाळा बंद आंदोलन करून त्यांच्या बदलीची मागणी केली. वादग्रस्त ठरलेल्या त्या शिक्षकाची प्रशासनाने गंभीर दखल घेत बदलीही केली होती. मात्र संबंधित शिक्षकाने न्यायालयाचे दरवाजे ठोठावत आपल्यावर प्रशासनाने अन्याय केला म्हणून दाद मागितली होती. न्यायालयानेही त्यांची बदली गैरसोयीच्या ठिकाणी करू नये असे सूचित केले होते.
दरम्यान, शासनाच्या नियमानुसार ज्या शाळांमध्ये कोणी शिक्षक वादग्रस्त ठरून विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन त्या ठिकाणी पुन्हा बदली करू नये असे असताना प्रशासनाने त्या शिक्षकाची बदली पुन्हा नामपूर येथे केली आहे. त्यामुळे अधिकच वाद चिघळला आहे. शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष प्रताप सावंत, सरपंच सोनाली निकम, सदस्य कविता सावंत, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक सावंत, बाजार समितीचे संचालक समीर सावंत, छोटू टोकरवाला, नारायण सावंत, माजी सरपंच प्रमोद सावंत यांनी त्या शिक्षकाला रु जू करून घेण्यास विरोध केला. यावेळी संतप्त पदाधिकाऱ्यांनी तत्काळ शाळेला टाळे ठोकून त्या वादग्रस्त शिक्षकाची अन्यत्र बदली केल्याशिवाय टाळे उघडणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. दरम्यान, तीन दिवस उलटूनही एकही अधिकारी न फिरकल्याने आज दुपारी अशोक सावंत यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून कैफियत मांडली. याची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गट शिक्षणाधिकारी साहेबराव बच्छाव यांची कानउघडणी केली. त्यानंतर आज दुपारी बच्छाव यांनी सरपंच निकम व शालेय समितीच्या पदाधिकाऱ्यांशी दोन तास चर्चा केली. मात्र त्या शिक्षकाच्या बदलीसंदर्भात ठोस आश्वासन न दिल्याने टाळे बंद आंदोलन सुरूच आहे. (वार्ताहर)