लोकसहभागातून शाळा डिजिटल
By admin | Published: August 20, 2016 12:28 AM2016-08-20T00:28:49+5:302016-08-20T00:38:13+5:30
शिक्षक झाले हायटेक : संगणक, प्रोजेक्टर, ई-लर्निंगद्वारे विद्यार्थ्यांना धडे
येवला : खापराची पाटी, पेन्सिलने त्यावर केलेला गृहपाठ आणि केलेला गृहपाठ शिक्षकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवा, पुसू नये म्हणून हातात पाटी धरून अनवाणी शाळेला निघालेला विद्यार्थी, पाठीवर खताच्या गोणीपासून बनवलेल्या पिशवीमध्ये जुन्या वापरलेल्या पुस्तकांचा संच असे चित्र अगदी अलीकडेही गावातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधून दिसत होते...
इंटरनॅशनल इंग्रजी शाळांचे खूळ खेडोपाडी पसरायला लागल्यापासून गावागावांमध्ये ‘आहे रे आणि नाही रे’ असा नवीन डिजिटल वर्ग विग्रह तयार होत आहे. त्यातून सरकारी शाळांमधून शिकवणाऱ्या शिक्षकांना मर्यादित साधन सुविधेमुळे मर्यादा येऊन मरगळ तसेच न्यूनगंड निर्माण होत आहे. मात्र याही परिस्थितीवर मात करून आपल्या शाळेचा दर्जा, ज्ञानदान पद्धती यात सुधारणा करून आधुनिक साधने लोकसहभागातून आपली शाळा डिजिटल करण्याचा प्रयत्न गावाने केला आहे. त्याला गावातील नागरिकांनी आणि शिक्षकांनी आपले योगदान देऊन शाळेला अद्ययावत संगणक यंत्रणा उभारण्यात येत आहे. यासाठी रहाडी गावच्या भूमिपुत्र असलेले भागवत सोनवणे यांनी उच्च क्षमतेचा संगणक, प्रोजेक्टर देऊन सुरुवात केली आहे. एका कार्यक्र मात एक संगणक आणि प्रोजेक्टर असे एकूण ५१ हजार रुपयांचे साहित्य रहाडी जिल्हा परिषद शाळेला भेट म्हणून दिले. त्यातून प्रेरणा घेऊन आधीच शाळेवर प्रेम करणारे मूळचे आंबेजोगाई येथील शिक्षक मुख्याध्यापक अमोल मुके यांनी आपल्या पगारातून पाच हजार रु पये डिजिटल शाळेसाठी देण्याचे घोषित केले. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत मूळचे चंद्रपूर येथील शिक्षक प्रकाश हरणे यांनी पाच हजार रुपये दिले. मूळचे औरंगाबाद येथील शिक्षक चंद्रशेखर खडांगळे यांनी पाच हजार तर स्थानिक शिक्षक रामदास भोंगाळ यांनी पाच हजार रु पये दिले.
विदर्भ-मराठवाडा येथून नोकरीनिमित्त आलेल्या शिक्षकांचे योगदान बघून मागे राहतील ते गावकरी कसले. कोणी १००, कोणी दोनशे तर कोणी ५०० असे एकूण १७ हजार रुपये तासाभरात जमा झाले. जमा झालेल्या पैशातून आणखी तीन संगणक येत्या दोन दिवसात खरेदी करण्यात येत आहे. रहाडी येथील गणेशवाडी येथील वस्ती शाळेला ही एक संगणक देण्यात येणार आहे. यावेळी सरपंच अंजनाबाई सोनवणे, उपसरपंच सोनुपंत भोंगळ, सुलतान शेख, दादाभाऊ गायकवाड, जेमादार पठाण, केशरबाई रोकडे, जुबेदाबी शेख, गीता महाजन सदस्य, शांताबाई मोरे हे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक चेतन बोद्रे, यासह बाबूभाई शेख, आजिम शेख, श्रवण मोरे, बाबासाहेब गायकवाड, सखाहरी गायकवाड, दत्तू सोनवणे, देवीदास गायकवाड, सुदाम रोकडे, गोरखनाथ महाजन, उत्तम रोकडे, नितीन गायकवाड, जगन पवार, संजय राऊत, मुख्याध्यपक मुके आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)