विद्यार्थ्यांमुळे गजबजला शाळेचा परिसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 09:28 PM2021-01-04T21:28:09+5:302021-01-05T00:11:55+5:30
सायखेडा : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे देशात आणि राज्यातील सर्व शाळा खबरदारीचा उपाय म्हणून दि. २२ मार्चपासून बंद करण्यात आल्या होत्या. शासन निर्णयामुळे नववीच्या पुढील वर्ग सुरू करण्याचा शासन आदेश आल्यामुळे दहा महिन्यांनंतर शाळेत मुले हजर झाल्याने मुलांच्या उपस्थितीमुळे शालेय परिसर गजबजल्याचे दिसून आले.
गोदाकाठ भागातील सायखेडा, भेंडाळी, चाटोरी, रामनगर, पिंपळगाव निपाणी, म्हाळसाकोरे, करंजगाव, चांदोरी या गावातील माध्यमिक शाळेतील वर्ग सुरू झाले असून, पहिल्याच दिवशी मुलांनी हजेरी लावली, शालेय परिपाठ म्हणत पूर्ववत झाले. ऑक्सिजन पातळी तपासून ५० टक्के विद्यार्थी उपस्थितीनुसार संमतीपत्रके घेऊन वर्ग सुरू करण्यात आले. मुख्याध्यापक व्ही. ए. निकम यांनी सॅनिटायझर, हात धुणे, एकमेकांच्या संपर्कात कोणी येणार नाही, या सूचना देऊन ऑनलाइन, ऑफलाइन वेळापत्रकाची माहिती सांगितली. अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरळीत चालेल, शुभेच्छा देऊन कोणी बाधित होणार नाही यासाठी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी काळजी घेण्याचे आवाहन मुख्याध्यापकांनी केले.