फुकटच्या ॲपमुळे शाळांची डोकेदुखी;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:17 AM2021-08-26T04:17:46+5:302021-08-26T04:17:46+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या १७ महिन्यांपासून शाळा ऑनलाईन सुरू आहेत. बऱ्याचदा ऑनलाईन वर्ग सुरू असताना चुकीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या १७ महिन्यांपासून शाळा ऑनलाईन सुरू आहेत. बऱ्याचदा ऑनलाईन वर्ग सुरू असताना चुकीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे ऑनलाईन वर्गाचे हसे होते अथवा शरमेने मान खाली घालावी लागते. कारण काही अश्लील मेसेज, व्हिडिओ अचानक सुरू होतात. असले प्रकार ऑनलाईन वर्गात अनेकदा घडत असल्याचे सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत. मागील १७ महिन्यांपासून महाराष्ट्रात ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. ऑनलाईन शिक्षण सुरू असल्यामुळे पालकांना नाइलाजाने विद्यार्थ्यांना नवीन मोबाईल घेऊन द्यावे लागत आहेत. त्यामुळे पालकांचा आर्थिक खर्च वाढला आहे. सोबतच ऑनलाईन शिक्षणामुळे शाळांची, शिक्षकांची व पालकांचीदेखील डोकेदुखी वाढलेली
आहे. ऑनलाईन शिक्षण सुरू असताना इंटरनेट आवश्यक असते आणि कुठल्याही शैक्षणिक लिंकवर गेले असता, नको त्या जाहिरातींच्या लिंक, तसेच नको त्या अश्लील लिंक, चित्र, व्हिडिओ समोर येतात. विद्यार्थी कुतूहलापोटी व उत्सुकतेपोटी लिंकला छेडतात. कधी अनावधानाने, तर कधी विद्यार्थी मुद्दाम व्हिडिओ ग्रुपवर सेंड करतात. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांना व शिक्षकांनाही त्याचा त्रास होतो. पालकांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
शाळांनी ही घ्यावी काळजी...
एखादा शिक्षक जर ऑनलाईन वर्ग घेत असेल, त्या शिक्षकाला वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची ओळख असायला
हवी. ऑनलाईन वर्गात खोड काढणाऱ्या विद्यार्थ्याच्या बाबतीत चौकस असण्याची गरज आहे. शिक्षकांनी पाठविलेली लिंक विद्यार्थ्यांनी इतरांना पाठवू नये, याची जाणीव विद्यार्थी यांना करून देण्याची गरज आहे.
--
पालकांनीही दक्ष राहण्याची गरज
पालकांना आता मोबाईलची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. विद्यार्थी काय शिकतात, यायकडे लक्ष देणे
गरजेचे आहे. मुले चोरून लपून काही चुकीचे व्हिडिओ, वेबसाईट पाहत असतील करीत असतील, तर त्यांच्यावर कटाक्ष ठेवणे पालकांची जबाबदारी आहे.
मुलांचे चुकीच्या गोष्टीबाबत समुपदेशन करणे गरजेचे आहे. शक्यतो ऑनलाईन वर्गानंतर मुलांकडे मोबाईल देऊच नये, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
असेही घडू शकते
ऑनलाईन शिक्षणाचे जितके फायदे आहेत, तितकेच तोटेही आता निदर्शनास येत आहेत. ऑनलाईनमुळे विद्यार्थी शैक्षणिक, शारीरिक, सांस्कृतिक, मानसिक व सामाजिक मूल्यांशी दुरावत चालला आहे. आरोग्यासंदर्भातही अनेक दुष्परिणाम निदर्शनास आलेले आहेत. त्याचे घातक परिणाम समोर येऊ शकतात.
-
सायबर तज्ज्ञ म्हणतात...
शाळा ज्या ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण देते, त्या ॲपचे ते प्रीमियम व्हर्जन असणे आवश्यक आहे. अशा ॲपला सुरक्षेच्या दृष्टीने अधिक उपाययोजना केलेल्या असतात. असे ॲप्स हाताळण्यासाठी त्यातील बारकावे शिक्षकांना अवगत करून देण्याची गरज आहे. त्यांना असे तंत्रज्ञान अवगत असेल तर शिक्षक असे प्रकार टाळू शकतील, असे मत सायबर तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.