आरटीईसाठी ३० जानेवारीपर्यंत शाळा नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:15 AM2021-01-22T04:15:06+5:302021-01-22T04:15:06+5:30
नाशिक : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायद्यांतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर प्रवेशासाठी ...
नाशिक : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायद्यांतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर प्रवेशासाठी पात्रताधारक शाळांना ३० जानेवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे. तर पात्रता असूनही नोंदणी न करणाऱ्या शाळांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यातील खासगी विनाअनुदानित प्राथमिक शाळांमध्ये आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी नाशिक जिल्हा प्राथमिक विभागाची तयारी सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यातील शाळा नोंदणीची प्रक्रिया गुरुवार (दि. २१) पासून सुरू झाली असून आरटीई प्रवेशासाठी पात्र असलेल्या शाळांना ३० जानेवारीपर्यंत ऑनलाइन नोंदणी करण्याची संधी देण्यात आली आहे. या प्रक्रियेत शाळेने केलेल्या नोंदणीची पडताळणी, शाळेचा प्रवेशस्तर आणि रिक्त जागांचा तपशील संबंधित गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी, मुख्याध्यापक यांनी तपासून पाहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दरम्यान, नाशिक शहरातील काही शाळांकडून आरटीई प्रवेश प्रक्रियेतून बाहेर राहण्यासाठी विविध पळवाटा शोधल्या जात असल्याने अशा शाळांवर शाळांची मान्यता रद्द करण्यासारखी गंभीर कारवाई करण्याची ताकीदही शिक्षण विभागाने दिली आहे.
इन्फो-
२०२०-२१ मधील आरटीई प्रवेश
शाळांची संख्या - ४४७
आरटीई अंतर्गत जागा - ५,५५७
आलेले अर्ज - १७,६३०
लॉटरीत निवड - ५,३०७
प्रथम फेरीतील प्रवेश - ३६८२
प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांचे प्रवेश - ९८४
एकूण प्रवेश - ४६६६
रिक्त जागा - ८९१