शाळेतील खोल्या तळीरामांचा अड्डा दुर्लक्षित वर्गखोल्या : केरकचरा साचल्याने सर्वत्र दुर्गंधी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 12:43 AM2018-01-06T00:43:19+5:302018-01-06T00:43:59+5:30
ओझर : येथील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेतील अनेक वर्षांपासून उघड्यावर पडलेल्या खोल्या तळीरामांसाठी मद्य घेऊन बसण्याचा अड्डा बनला आहे.
ओझर : येथील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेतील अनेक वर्षांपासून उघड्यावर पडलेल्या खोल्या तळीरामांसाठी मद्य घेऊन बसण्याचा अड्डा बनला असून, यापैकीच काही खोल्या शौचालयासाठी वापरल्या जात असल्याचे चित्र दिसत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. येथे केरकचराही साचला असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. सुमारे तीन-चार वर्षांपूर्वी येथील महामार्गालगत असलेल्या जिल्हा परिषदेच्या मुलांची शाळा क्र. १ व २ या प्राथमिक शाळेमध्ये सुमारे चारशेच्या जवळपास विद्यार्थ्यांचे सतत होत असलेल्या गळतीमुळे स्थलांतर करण्यात आले आहे. यानंतर काही दिवस आहे त्याच परिस्थितीमध्ये शिक्षण घेत असताना पालकांनी आक्षेप घेतला. यामुळे सदर शाळा ही बाजारपेठेत स्थलांतर करण्यात आली. यामुळे प्रचंड दाटीवाटीने शाळेत बसावे लागत आहे. यात यावर्षी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची भर पडली ती वेगळी. गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असताना प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे काही पालकांचे मत आहे. बाजारपेठेत पाण्याची व्यवस्था पुरेशी नाही. शौचालय आहे परंतु ते फक्त मुलींसाठी असल्याने मुले शाळेबाहेर उघड्यावर शौचास बसतात. यामुळे प्रचंड प्रमाणात दुर्गंधी पसरत असल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पाण्याची टाकी छोटी असल्याने तीदेखील अपुरी पडत आहे. पावसाळ्यात तर अडचणींमध्ये आणखी भर पडत असते. सदर व्यथा आता नेमकी कुणाला सांगावी हेदेखील कळेनासे झाले आहे. शाळा व्यवस्थापनाने वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. ग्रामसभेतदेखील यावर आवाज उठविण्याचा प्रयत्न झाला आहे. यात गेल्या वर्षीपासून मुले नंबर १ च्या पाच खोल्या, तर मुले नं. २ च्या सहा खोल्या मंजूर आहेत. मग यासाठी मिळालेल्या निधीचे पुढे काय झाले, असा प्रश्न विचारला जात आहे. बाजारपेठ येथील शाळा इमारतदेखील जुनाट झाली आहे. भविष्यात मुलांचे शिक्षण उघड्यावर पडण्याअगोदर प्रशासनाने आताच उपाययोजना करण्याची मागणी येथील पालकांनी केली आहे. सदर शाळा खोल्यांविषयी अनेकदा काही पालकांनी संबंधित अधिकाºयांशी संपर्क केला. परंतु प्रत्येक वेळेस वेगवेगळी उत्तरे मिळत असून, जिल्हा परिषद शाळेतील मुलांनाच शासन नेहमी दुय्यम वागणूक का देते, असा संतप्त सवाल येथील पालकांनी विचारला आहे.
प्रत्येक खोलीमध्ये घाण-कचरा
या ठिकाणी ज्या खोल्या काही प्रमाणात चांगल्या स्थितीत आहेत त्यामध्ये शाळा भरवली जात आहे.येथून काही फुटांवर सदर दुर्गंधीसुटली आहे शाळा खोल्या मागील बाजूस उघड्या असून, पुढील बाजूस टाळे लावण्यात आले आहे. प्रत्येक खोलीमध्ये घाण-कचरा साचला असून, या ठिकाणी रिकाम्या बाटल्यांसह घाण पडलेली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या सर्व प्रकाराकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. काम रेंगाळत गेल्याने सुमारे तीन वर्षांपासून होणारी विद्यार्थ्यांची गैरसोय आजही कायम आहे. विशेष म्हणजे, सुमारे चारशेच्या जवळपास असलेली विद्यार्थिसंख्या मुलींच्या शाळेत समाविष्ट झाली आहे.