शाळेतील स्वच्छतागृहांमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा धोका टळला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:09 AM2021-02-19T04:09:40+5:302021-02-19T04:09:40+5:30
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शाळेत स्वच्छतागृहाची व्यवस्था असावी, असा ...
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शाळेत स्वच्छतागृहाची व्यवस्था असावी, असा उपक्रम राज्य सरकारने हाती घेऊन त्यासाठी प्रत्येक शाळेसाठी निधीची तरतूद करण्याचे आदेश आहे. काही वर्षांपूर्वी आमची शाळा प्रकल्पांतर्गंत शाळा खोल्या बांधण्याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहे बांधण्याचा मोठा उपक्रम हाती घेण्यात आला होता. त्यातून अनेक शाळांमध्ये स्वच्छतागृहांची निर्मिती करण्यात आली. त्यातही मुलांसाठी व मुलींसाठी वेगळी स्वच्छतागृहे बांधण्यात आल्याने त्यातून मोठी सोय होऊ शकली. ग्रामीण भागात मधल्या सुटीत विद्यार्थी शाळेच्याबाहेरच विधीसाठी जात असल्याने त्यातून रोगराई व अस्वच्छता, दुर्गंधीचा परिणाम होत होता. आता शाळांमध्ये नळांची सोय करण्यात आल्याने या स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छताही केली जात असल्याचे सांगण्यात आले.
-----
९ शाळांमध्ये नाहीत स्वच्छतागृहे
जिल्ह्यातील ग्रामीण भाागातील नऊ प्राथमिक शाळेत स्वच्छतागृहे नसल्याची बाब अलिकडेच निदर्शनास आली आहे. जिल्ह्यात ३२६६ प्राथमिक शाळा असून, यातील बहुतांशी शाळांच्या आवारात स्वच्छतागृहे उभारणीसाठी जागाच शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले, तर काही शाळांना लागूनच वन खात्याची हद्द असल्याने जागेची परवानगी मिळत नसल्यामुळे स्वच्छतागृहे बांधण्यात अडचणी आल्याचे समजते.
-------
ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या काही शाळा खूप जुन्या आहेत. त्यावेळी स्वच्छतागृहांची कोणतीही व्यवस्था केली नसली, तरी काळानुरूप आता प्रत्येक शाळेत स्वच्छतागृहे बांधण्यात येत आहेत. त्यातून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची व आरोग्याची सवय लागण्यास मदत होते.
- बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष, जिल्हा परिषद
-------
३२६६ - जिल्हा परिषदेच्या एकूण शाळा
४३२- दुरवस्था झालेली स्वच्छतागृहे
०९ - शाळांमध्ये नाहीत स्वच्छतागृहे
३,५०,०००-दुरूस्तीसाठी आवश्यक निधी
-----------------
* बागलाण- २९८- ४
* इगतपुरी- २२२- २
* मालेगाव- २९०- २
* निफाड- २२४-२
* पेठ- १८८-२
* सिन्नर- २०९- २