ठराविक दुकानातूनच वस्तू खरेदीचा शाळांचा आग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:45 AM2019-06-25T00:45:05+5:302019-06-25T00:45:22+5:30
नाशिकरोड, एकलहरे, जेलरोड येथील बहुतेक शाळांनी विशिष्ट दुकानातूनच शैक्षणिक साहित्य खरेदीची सक्ती केल्यामुळे दुकानात पालकांची पाल्यांसह प्रचंड गर्दी होत असून, जागा कमी आणि गर्दी मोठी यामुळे ग्राहकांना तासन् तास ताटकळत दुकानाबाहेर उभे रहावे लागत आहे. त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे.
एकलहरे : नाशिकरोड, एकलहरे, जेलरोड येथील बहुतेक शाळांनी विशिष्ट दुकानातूनच शैक्षणिक साहित्य खरेदीची सक्ती केल्यामुळे दुकानात पालकांची पाल्यांसह प्रचंड गर्दी होत असून, जागा कमी आणि गर्दी मोठी यामुळे ग्राहकांना तासन् तास ताटकळत दुकानाबाहेर उभे रहावे लागत आहे. त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे.
नाशिकरोड, जेलरोड, सिन्नरफाटा, सायखेडारोड, एकलहरे परिसरात अनेक मराठी, इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. त्या शाळांतील विद्यार्थ्यांचा ठराविक रंगाचा गणवेश खरेदी करण्यासाठी जेलरोडवरील एका ठराविक दुकानातूनच गणवेश खरेदी करण्याचा आग्रह शालेय व्यवस्थापनाने पालकांना केली आहे. त्यामुळे नाइलाजास्तव आपल्या पाल्याला घेऊन पालक त्या दुकानात खरेदीसाठी जात असून, दुकानाचा आकार पाहता एकावेळी ८ ते १० ग्राहक आतमध्ये पाल्यासह जाऊन खरेदी करू शकतात. मात्र प्रत्येकालाच घाई असल्याने जास्तीत जास्त ग्राहक दुकानात शिरण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे धक्काबुक्की होत असून, त्याचा फटका महिला व लहान मुलांना बसत आहे. महिलांची तर अक्षरश: कुचंबना होत असून, त्यांना पाल्यांना कडेवर घेऊन दुकानाबाहेर तासन् तास उभे रहावे लागत आहे. या सर्व प्रकारामुळे पालक वैतागले असून, विशिष्ट दुकानातून खरेदीची सक्ती करणाऱ्या शाळांच्या विरोधात तक्रार करण्याची तयारी चालविली आहे.
नाशिकरोड, एकलहरे परिसरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळा ठराविक दुकानातूनच शालेय गणवेश खरेदी करण्याचा आग्रह करतात. त्यामुळे सर्वसामान्य पालकांचा वेळ व पैसा खर्च होतो. एका ठराविक दुकानातूनच गणवेशाची खरेदी करण्यामागे संस्था व शाळाचालकांचे आर्थिक हितसंबंध असल्याची शंका येते. हे वेळीच थांबले नाही तर समता परिषद व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने आंदोलन छेडले जाईल.
- शानू निकम, अध्यक्ष, समता परिषद