शाळेची भिंत कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 10:46 PM2020-07-03T22:46:41+5:302020-07-04T00:37:50+5:30
मुसळधार पावसामुळे कळवण तालुक्यातील रवळजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची भिंत कोसळली. त्यामुळे धोकादायक शाळांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
पाळे खुर्द : मुसळधार पावसामुळे कळवण तालुक्यातील रवळजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची भिंत कोसळली. त्यामुळे धोकादायक शाळांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
या शाळेची पूर्ण इमारत अतिशय जीर्ण झाली आहे. अधिक पाऊस झाला तर संपूर्ण इमारत कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे़ सदर शाळेची इमारत पुन्हा नव्याने बांधण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सदर इमारतीची गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. शौचालय व प्रसाधनगृहातदेखील घाणीचे साम्राज्य आहे. शाळेच्या परिसरातील नागरिक तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. शासनाने लॉकडाऊन घोषित केला असला तरी शिक्षण विभागाकडून शाळेंची पाहणी होत नाही. पाच महिन्यापासुन शाळा बेवारस पडल्या असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
जिल्हा परिषदेच्या सुमारे ३३०० शाळा आहेत. त्यातील सुमारे १५० शाळांच्या इमारती भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या आहेत. २६०च्या शाळा इमारती धोकादायक असल्याचे सांगितले जाते. बऱ्याच शाळा इमारतींना पावसाळ्यात गळती लागते. विद्यार्थ्यांना वर्ग खोल्यांमध्ये बसायला जागा राहत नाही.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींबाबत चर्चा होते. प्रत्यक्षात किरकोळ डागडुजी करत वेळ निभावून नेली जाते. शाळांच्या धोकादायक इमारतीबाबत जिल्हा परिषद प्रशासनासह लोकप्रतिनिधीही उदासीन असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे.
मागील एक वर्षापूर्वी रवळजी शालेय समितीने ठराव करून संबंधित विभाग व जिल्हा परिषद इमारत व दळणवळण विभागास सदर शाळेत वर्ग न भरविणे व दुसरीकडे पर्यायी व्यवस्था करण्याचा ठराव पाठविला आहे. परंतु शालेय प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहे़ त्याचप्रमाणे रवळजी शाळेत पहिती ते सातवीपर्यंत वर्ग असून, ३०० ते ३२५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
शाळेत सुमारे ७ ते ८ शिक्षक असून, एकही शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. मुख्याध्यापकपण प्रभारी असून, मुख्याध्यापकांची जागा रिक्त आहे. शिक्षणाधिकारी यांचेसुद्धा लक्ष नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. या प्रकाराची गंभीर दखल न घेतल्यास लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्याचा इशारा बबन वाघ, गोकुळ जाधव, बाळासाहेब जाधव, प्रकाश भालेराव, प्रवीण गांगुर्डे आदींनी दिला आहे़